मातेपासून होणाऱ्या संसर्गात घट
By admin | Published: December 1, 2014 03:50 AM2014-12-01T03:50:22+5:302014-12-01T03:50:22+5:30
प्रभावी उपचार पद्धतीमुळे एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी आशेची नवी पालवी फुटली आहे. या उपचार पद्धतीमुळे या रुग्णांचे आयुष्यमान कमालीचे वाढलेले आहे
बारामती : प्रभावी उपचार पद्धतीमुळे एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी आशेची नवी पालवी फुटली आहे. या उपचार पद्धतीमुळे या रुग्णांचे आयुष्यमान कमालीचे वाढलेले आहे. तर एचआयव्हीबाधित गरोदर मातांकडून त्यांच्या नवजात अर्भकाला होण्याचे प्रमाण २ ते ५ टक्क्यांवर आणण्यात बारामती उपजिल्हा रुग्णालयातील अँटी-रेट्रोव्हायरस ट्रिटमेंट (एआरटी) केंद्राला यश मिळाले आहे.
एआरटीचा मुळ उद्देश एचआयव्हीग्रस्तांचे आयुष्यमान वाढविणे तसेच विषाणूंचे प्रमाण कमी करणे हा आहे. भारतात एआरटीची एकुण ४२५ केंदे्र कार्यरत आहेत. तर महाराष्ट्रात ७० केंद्रे कार्यरत आहेत.पुणे जिल्ह्यातील केंद्रात पुणे येथील वायएमसी, एएफ एमसी,नारी,बीएसआरसी रूग्णालय,जिल्हा रूग्णालय औंध आणि बारामती उपजिल्हा रूग्णालय यांचा समावेश आहे.
मार्च २०१३ मध्ये महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातुन बारामती उपजिल्हा रूग्णालयात तालुकास्तरिय पहिले ‘अँण्टी टेट्राव्हायरस ट्रिटमेंट (एआरटी)’केंद्र सुरू झाल्यानंतर एड्सग्रस्त रूग्णांचे आयुष्यमान वाढण्यास मदत झाली आहे.तर येथील समुपदेशनाच्या मदतीने त्यांच्यात जगण्याची नवी उमदे निर्माण होऊ लागली आहे. विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे एआरटीवर असणाऱ्या रूग्णांची संख्या वाढते आहे.या अंतर्गत उपचारांमध्ये देण्यात येणाऱ्या ‘ टीएलई ’ या गोळ्यांमुळे रूग्णांमध्ये रोगप्रतिकारकशक्ति वाढण्यास मदत होत आहे.,अशी माहिती बारामती केंद्राचे समुपदेशक उमेश आढे यांनी दिली. बारामतीतील एआरटी केंद्र सुरू झाल्यामुळे बारामतीसह अन्य तालुक्यातील रूग्णांना या समुपदेशनाचा लाभ होत आहे.२००६ नंतर मार्च पर्यंत रूग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी एड्सग्रस्तांच्या मृत्युमध्ये घट झाली आहे. २००६ पासून बारामती उपजिल्हा रूग्णालय, रूई ग्रामीण रूग्णालय,सुपे ग्रामीण रूग्णालय येथे ‘एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र’ कार्यान्वित करण्यात आली आहेत.त्यामुळे तपासणीसाठी आलेला एखादा रूगण् संशयित वाटल्यास त्याची एआरटीपूर्व तपासणी केली जाते. यामध्ये क्षयरोग, यकृत, रिनल फंक्शनल टेस्ट आदी तपासण्यांचा समावेश होतो.