थेरगावात दुर्गंधीचे साम्राज्य
By admin | Published: March 1, 2017 12:37 AM2017-03-01T00:37:38+5:302017-03-01T00:37:38+5:30
समर्थ कॉलनी गल्ली नं. ७ मध्ये अनेक महिन्यांपासून ड्रेनेज लाईन नादुरुस्त झाल्याने मैलामिश्रित पाणी भर रस्त्यावर येत आहे
वाकड : थेरगाव परिसरातील पवारनगरमधील समर्थ कॉलनी गल्ली नं. ७ मध्ये अनेक महिन्यांपासून ड्रेनेज लाईन नादुरुस्त झाल्याने मैलामिश्रित पाणी भर रस्त्यावर येत आहे, तर काहींच्या थेट घरात शिरत असल्याने दुर्गंधीचा सामना करीत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी रहिवासी करीत आहेत.
समर्थ कॉलनी गल्ली ७ मध्ये सुमारे ८० घरे असून, दोनशे नागरिक येथे वास्तव्यास आहेत. येथील वातावरणात दुर्गंधी पसरल्याने नाकाला रुमाल बांधून राहण्याची नामुष्की रहिवाशांवर ओढाली आहे. मैलामिश्रित दुर्गंधीयुक्त पाण्याचा लोंढा रस्त्यावर नेहमीच पसरत असल्याने विद्यार्थी, पालक व ज्येष्ठांना कसरत करत पुढे ये-जा करावी लागते. सकाळी आणि सायंकाळी पाणी सुटण्याच्या वेळात दाब वाढल्याने हे दुर्गंधीयुक्त पाणी रहिवाशांच्या थेट घरात जाते.
या पाण्यामुळे येथे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असून, रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वाढली असून, अनेक वेळा तक्रारी करूनही निवडणूक झाल्यावर काम करता येईल, असे उडवा-उडवीची उत्तरे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून दिली जातात. मग येथे रहिवाशांचा जीव गेल्यावर महापालिका प्रशासन काम करणार का असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. रोगराईचा उद्रेक होण्यापूर्वी जलनिस्सारण विभागाने गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
>चेंबरफुटीमुळे रस्त्यावर पाणी
थेरगाव : लक्ष्मणनगर येथे महिन्यापासून चेंबर फुटले आहे व त्यातून दूषित पाणी रस्त्यावर जमा होत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे चेंबर मुख्य रस्त्यात असल्यामुळे पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे हे घाण पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. तसेच या ठिकाणी शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. आरोग्य विभागाचे या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते आहे. शहरात सध्या डेंगी, मलेरिया यांसारख्या
आजारांनी थैमान मांडले आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन चेंबर दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.