देहू-आळंदी तीर्थक्षेत्र युनेस्कोच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:20+5:302021-07-02T04:09:20+5:30
संभाजीराजे छत्रपती : केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार पिंपरी : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे देहूगाव आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे आळंदी ...
संभाजीराजे छत्रपती : केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार
पिंपरी : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे देहूगाव आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे आळंदी हे क्षेत्र आणि वारी युनेस्कोच्या जागतिक अमूर्त हेरिटेजमध्ये समाविष्ट करावे, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असे आश्वासन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी श्रीक्षेत्र देहू येथे दिले.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संभाजीराजे म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास आम्हाला बोलावले याबद्दल मी आभार मानतो. संत तुकाराम महाराजांनी भक्ती दिली. या भक्तीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना गुरुस्थानी मानले होते आणि तुकाराम महाराजांनी सांगितले की जातीधर्माच्या पलीकडे जाऊन आपला समाज उभा राहिला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज यांनीही हीच भूमिका ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला पालखी सोहळ्यात पूजेचा मान मिळाला. आम्ही तुकोबांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहे.’’
संभाजीराजे म्हणाले, ‘‘वारीला साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. या सोहळ्यात २० लाख लोक एकत्र येतात. ही गोष्ट अमूर्त वारसा हक्क यामध्ये नोंदविली जावी, यासाठी युनेस्कोमध्ये नोंद होण्यासाठी दोन वर्षे अगोदर मी संसदेत विषय मांडला होता. या स्थळांची नोंद अमूर्त जागतिक वारसा हक्कमध्ये करावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’’
---
‘घरीच थांबून वारी करा’
वारकऱ्यांनी घरीच थांबून वारी करावी, असे आवाहन करून संभाजीराजे म्हणाले, की कोरोनाच्या संकटात आपण सगळे आहोत. त्यामुळे वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. संकटातून बाहेर येण्यासाठी यंदाची वारी ही घरीच बसून अनुभवावी. कोरोना गेल्यानंतर पुढील वर्षी आपण मोठ्या उत्साहाने हा सोहळा साजरा करू.