देहू देऊळवाडा उजळला
By admin | Published: November 16, 2015 01:48 AM2015-11-16T01:48:14+5:302015-11-16T01:48:14+5:30
श्री संत तुकाराममहाराज मंदिराच्या आवारात सुमारे दीड हजार तेलाच्या वातींचे दिवे जाळून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
देहूगाव : श्री संत तुकाराममहाराज मंदिराच्या आवारात सुमारे दीड हजार तेलाच्या वातींचे दिवे जाळून दीपोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या जीवनातील ताटी उघडा ज्ञानेश्वरा या प्रसंगावर सुंदर रांगोळी काढली होती.
यंदाही संस्थानच्या वतीने दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. हा दीपोत्सव सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. मंदिराच्या ओवऱ्या, जोते, दीपमाळा, पायऱ्यांवर दिवे लावण्यात आले होते. येथील शीतल मोरे, मधुरा मोरे, प्राची मोरे, प्रियंका मोरे, कोजागिरी मोरे, सायली काळोखे यांनी मंदिर परिसरात रांगोळ्या काढल्या. रांगोळ्यांच्या भोवती पणत्या लावण्यात आल्या होत्या. गावातील व पंचक्रोशीतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दीपोत्सव झाल्यानंतर आलेल्या भाविकांनी दर्शनानंतर पेढे वाटून आनंद साजरा केला. या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त अशोक निवृत्ती मोरे, सुनील दिगंबर मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
वाकडमधील कामगारांना मदत
वाकड : परिसरातील स्वच्छता कामगारांना नगरसेवक विनायक गायकवाड यांच्याकडून कपडे व मिठाई वाटली. कार्यालयीन अधीक्षक गणेश विपट, अतिक्रमण निरीक्षक अजय सिन्नरकर,अतिक्रमण सहायक जगन्नाथ काटे आदी उपस्थित होते. या वेळी ३२ कामगारांना साडीचोळी आणि मिठाई दिली. (प्रतिनिधी)
सजावटीत दंग
वाकड : येथील मनपा शाळेत बालवर्गातील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवीत दिवाळी साजरी केली. किल्ला बनविणे, घरकुल सजावट, कागदी फटाके बनविणे आदी विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका शोभा सूर्यवंशी, सुंनदा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीचे महत्त्व सांगत शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)