देहूच्या पहिल्या नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण तर उपनगराध्यक्षापदी रसिका काळोखे बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 04:07 PM2022-02-11T16:07:21+5:302022-02-11T16:11:13+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष
देहूगाव: देहू नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता चव्हाण व उपनगराध्यक्षपदी रसिका काळोखे यांची बिनविरोध निवड करण्यात झाली. सकाळी 12 वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात पिठासिन अधिकारी हवेलीचे प्रांत संजय असवले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा सुरू झाली. यावेळी सभागृहात राष्ट्रवादी कॉग्रेसचे 16 सदस्य उपस्थित होते. सभेनंतर आमदार सुनिल शेळके यांनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
पिठासिन अधिकारी संजय असवले यांनी दिलेल्या माहिती नुसार देहूचे नगराध्यक्षपद अनुसुचित जातीच्या महिलेसाठी राखीव होते. अध्यक्षपदासाठी केवळ स्मिता चव्हाण यांचाच अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदाच्या रिंगणातून पूजा दिवटे यांनी काल गुरूवारी माघारी घेतली होती. त्यामुळे निवडणूक घेण्याची वेळ आली नाही.
नगराध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर लगेचच उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. सकाळी 11.30 सुमारास वाजता उपनगराध्यक्ष पदासाठी रसिका काळोखे यांचा एकमेव अर्ज दाखल केला. अध्यक्षपदाच्या निवडणूकी नंतर लगेचच उपनगराध्यक्षपदी रसिका काळोखे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचे पिठासिन अधिकारी संजय असवले व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
गटनेते योगेश परंडवाल यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे सभागृह नेता या नात्याने स्वागत करीत गावाच्या विकासासाठी जे जे चांगले करता येईल ते राजकारण बाजुला ठेवून एकत्र येवून काम करू असे सांगितले. यानंतर सभा संपली.