देहूगावः इंद्रायणी नदीत दोन लहान मुले बुडाली, शोधकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 02:02 PM2021-11-26T14:02:46+5:302021-11-26T14:04:40+5:30
घटना पोलिसांना कळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दळवी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत...
देहूगावः येथील माळीनगर बायपासच्या इंद्रायणी नदीच्या पुलाखाली बांधकाम कामगारांच्या दोन लहान मुले बुडाली असून शोधकार्य सुरू आहे. ही घटना सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हे दोन्ही मुले सख्खे भाऊ आहेत. साहील विजय गौड ( वय 10 वर्षे ) व अखिल विजय गौड ( वय 8 वर्षे, सध्या राहणार देहूगाव सिद्धेश्वर मंदिराजवळ, मुळगाव देवरिया देहात, कुशिनगर, गोरखपूर) अशी या बुडालेल्या मुलांची नावे आहेत.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, ही मुले सकाळी इंद्रायणी नदीकाठी गेली होती. सध्या कार्तिकी एकादशी असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीला पाणी सोडण्यात आले आहे. या वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले नदीच्या पाण्यात बुडाली आसावित असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला मुलांच्या वडिलांनी व इतर बांधकाम कामगारांनी पाण्यात शोधाशोध केली. मात्र त्यांचे मृतदेह हाती लागले नाहीत.
घटना पोलिसांना कळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दळवी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. या मुलांच्या शोधकार्य साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पी एम आर डी एचे अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे. त्यांना मदतीसाठी येथील एनडीआरएफ च्या जवानांना देखील बोलावण्यात आलेले आहे. हवेली तहसिलदार गीता गायकवाड व तलाठी अतुल गिते देखील घटनास्थळा कडे रवाना झाले आहेत.