देहूरोड राष्ट्रवादी काँग्रेस समिती अखेर बरखास्त
By admin | Published: January 31, 2015 12:53 AM2015-01-31T00:53:12+5:302015-01-31T00:53:12+5:30
देहूरोड कॅन्टोन्मेंट निवडणुकीतील बंडखोरी व काही पदाधिकाऱ्यांनी विरोधी काम केल्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव झाला.
किवळे : देहूरोड कॅन्टोन्मेंट निवडणुकीतील बंडखोरी व काही पदाधिकाऱ्यांनी विरोधी काम केल्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर देहूरोड शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस समिती आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सेल समित्या बरखास्त करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत (2008 ते 2013) बोर्डात अपक्षांच्या मदतीने राष्ट्रवादीची सत्ता आली होती. मध्यंतरी काही काळ बोर्डाचा कारभार द्विसदस्य समितीमार्फत केला जात होता. त्यांनतर देहूरोड बोर्डाच्या सात जागांसाठी अकरा जानेवारीला निवडणूक झाली. या निवडणुकीत पक्षाच्या वतीने सात उमेदवार देण्यात आले होते. यातील एका उमेदवाराला ए बी फॉर्म देऊनही त्याने उमेदवारी अर्जात प्रथम पसंतीचे चिन्ह
चुकीचे लिहिल्याने त्याला
पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळाले नव्हते. तर वॉर्ड क्रमांक सातमधून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतली होती.
बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी केली होती. तर काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर देहूरोडच्या सर्व समित्या बरखास्त करण्यात आल्या असून, राष्ट्रवादीच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष प्रदीप बेंद्रे व देहूरोड शहर युवक अध्यक्ष धनराज शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. संबंधितांशी चर्चा करून येत्या आठवड्यात देहूरोड राष्ट्रवादीसाठी प्रभारी अध्यक्ष निवडण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सांगितले. (वार्ताहर )