देहूरोडला पोलिसांवर प्राणघातक हल्ला
By admin | Published: May 28, 2017 03:37 AM2017-05-28T03:37:14+5:302017-05-28T03:37:14+5:30
तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटमार केल्याप्रकरणी तपास करताना एका लुटारुला पकडणाऱ्या पोलीस पथकावर मोटार चढवित दोघांना गंभीर जखमी करून पसार
- लोकमत न्यूज नेटवर्क
देहूरोड : तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटमार केल्याप्रकरणी तपास करताना एका लुटारुला पकडणाऱ्या पोलीस पथकावर मोटार चढवित दोघांना गंभीर जखमी करून पसार झाल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री देहूरोड हद्दीतील थॉमस कॉलनी (मामुर्डी) येथील एका चर्चजवळ घडली.
सुभान सोलंकी (रा. गाधींनगर, देहूरोड,) असे पसार झालेल्याचे नाव आहे. देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गहुंजे येथे गुरुवारी पहाटे घडलेल्या लुटमार प्रकरणातील लुटारू, चोरी गेलेली मोटार (एमएच १२ एलपी ८०१६) आणि चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत असताना देहूरोड येथील थॉमस कॉलनी चर्चजवळ गुन्ह्यातील मोटार चालवित असताना पोलीस पथकाला दिसले. पोलिसांनी त्यास अडवित लुटारुस पकडताना ‘सुभान थांब पळू नको ’असे बोलत असतानाच पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे व प्रशांत बुनगे याना गंभीर दुखापत करून पसार झाला.
घटनेनंतर पोलिसांना मोटार शेलारवाडी जवळ आढळून आली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात पोलिसांवरील प्राणघातक हल्ला आणि सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.