‘देखो अपना देश’ पुण्यातून दुसऱ्यांदा सुटणार ‘भारत गौरव रेल्वे’ उत्तर भारतातील पर्यटन स्थळे पाहायला मिळणार
By नितीश गोवंडे | Published: June 7, 2023 02:59 PM2023-06-07T14:59:04+5:302023-06-07T14:59:45+5:30
‘महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी यात्रा’ या नावाने उत्तर भारतातील पर्यटन स्थळांसाठी सोडण्यात येणार
पुणे: रेल्वे मंत्रालयाच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत सोडण्यात येणारी ‘भारत गौरव रेल्वे’ येत्या २२ जून रोजी पुण्यातून उत्तर भारतात सुटणार आहे. १ जूलै रोजी पुन्हा पुण्याला येईल. याआधी देखील ‘महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभुमी’ भारत गौरव रेल्वे पुण्यातून सोडण्यात आली होती. या रेल्वेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
भारत गौरव यात्रेची पहिली रेल्वे पुणे रेल्वे स्थानकावरून २८ एप्रिल रोजी सुटली होती. ही रेल्वे ‘पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा’ या नावाने धावली. त्यानंतर दुसरी रेल्वे ११ मे रोजी पुण्यातून सुटली. ही गाडी ‘महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी यात्रा’ या नावाने उत्तर भारतातील पर्यटन स्थळांसाठी सोडण्यात आली होती. तिसरी २३ मे रोजी रेल्वे मुंबईतून (पुण्यामार्गे) दक्षिणेकडे गेली होती. आता चौथी रेल्वे पुन्हा उत्तर भारतात सोडण्याचा निर्णय रेल्वे आणि आयआरसीटीसी प्रशासनाने लोकआग्रहास्तव घेतला आहे.
ही रेल्वे पुणे ते उज्जैन- आग्रा- मथुरा- हरिद्वार- ऋषिकेश- अमृतसर- वैष्णोदेवी ते परत पुणे अशी यात्रा करणार आहे. या यात्रे दरम्यान पर्यटकांना ओंकारेश्वर मंदिर, महाकालेश्वर मंदिर, ताजमहाल, कृष्ण जन्मभूमी, ऋषिकेश (गंगा आरतीसह), सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर आणि माता वैष्णोदेवी मंदिर पाहता येणार आहे. अधिक माहिती संकेतस्थळ www.irctctourism.com वर उपलब्ध आहे.
‘भारत गौरव’ रेल्वेत या सुविधा मिळणार..
- स्थानिक स्थळांची माहिती मिळणार
- सोबतीला गाइड असणार
- मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था
- रेल्वेतच जेवणाची व्यवस्था
- हॉटेल ते रेल्वे स्थानक आणि हॉटेल ते स्थानिक स्थळांसाठी वाहनाची सोय
- पॅकेजमध्येच या सर्व बाबींचे शुल्क आकारले असल्याने, प्रवाशांना वेगळे शुल्क देण्याची गरज नाही