युतीच्या चर्चेत उमेदवार यादीला विलंब
By admin | Published: January 15, 2017 05:51 AM2017-01-15T05:51:15+5:302017-01-15T05:51:15+5:30
महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराला कमी म्हणजे अवघे १२ दिवस मिळणार असल्याने उमेदवार यादी लवकर जाहीर करावी, अशीच सर्वपक्षीय इच्छुकांची मागणी आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराला कमी म्हणजे अवघे १२ दिवस मिळणार असल्याने उमेदवार यादी लवकर जाहीर करावी, अशीच सर्वपक्षीय इच्छुकांची मागणी आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टी-शिवसेना या प्रमुख पक्षांच्या प्रदेश नेत्यांकडून आघाडी किंवा युतीचा निर्णय होत नसल्याने त्यांचे स्थानिक नेते यादी जाहीर करण्यास विलंब करीत आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी व्हावी, यावरून फक्त चर्चा सुरू आहे; नेत्यांमध्ये मात्र अद्याप एकही बैठक झालेली नाही. तीच स्थिती भाजपा-शिवसेनेची आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला आहे; पण सेनेकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांचे स्थानिक नेते पक्षप्रमुख काय निर्णय देतात, याकडे डोळे लावून बसले आहेत. भाजपाशी युती केलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांनीही आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत; मात्र भाजपाकडून त्यांना कोणत्या जागा दिल्या जाणार, याचा निर्णय होत नसल्याने त्यांनाही त्यांची नावे जाहीर करण्यास मर्यादा आल्या आहेत. मनसेने त्यांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा अहवाल पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दिला असून, त्यांच्याकडून येत्या दोन ते तीन दिवसांत उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. नव्या रचनेतील ४१ प्रभागांमध्ये एकूण १६२ जागा आहेत. प्रमुख राजकीय पक्षांकडे त्यापेक्षा कितीतरी जास्त उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. सर्वाधिक म्हणजे ८५१ इच्छुकांनी भाजपाकडे, तर त्याखालोखाल राष्ट्रवादीकडे ५७५ जणांनी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखती दिल्या आहेत. काँग्रेसकडे ५३५ जणांनी व सेनेकडे ६८७ जणांनी मुलाखती दिल्या आहेत.
मनसेकडेही ५२५ जण इच्छुक आहेत. यात एकाच प्रभागातून अनेक जणांनी मुलाखती दिल्यात, तर काही पक्षांना एखाद्या प्रभागात उमेदवारच मिळालेला नाही. विशेषत:, महिला उमेदवाराबाबत काही पक्षांची काही प्रभागात अडचण झाली आहे. सर्वच पक्षांचे मुलाखतीचे अहवाल तयार झाले असून, ते पक्षाच्या उमेदवार निवड समितीकडे देण्यात आले आहेत.
विद्यमानांना प्राधान्य : पक्षांतर केलेल्यांचा विचार
चार सदस्यांचा एक प्रभाग, अशी रचना असल्यामुळे बहुतेक राजकीय पक्षांकडून अपवाद वगळता विद्यमान नगरसेवकांना प्राधान्य मिळण्याची चिन्हे आहेत. पक्षांतर केलेल्या नगरसेवकांचाही त्यांत समावेश आहे. त्यांच्या प्रभागातील अन्य तीन उमेदवारही त्यांच्या पसंतीने देण्यात येतील, असे दिसते. येत्या दोन ते तीन दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांकडून पहिली यादी म्हणून ही नावे जाहीर करण्यात येतील. त्यानंतर आघाडी किंवा युती होते आहे अथवा नाही, हे लक्षात घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी व सेना-भाजपा यांच्याकडून दुसरी यादी जाहीर केली जाईल.