अधिकारी निवडणुकीत गुंतल्याने पाणीटंचाई निवारणाला विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 11:25 PM2019-04-05T23:25:08+5:302019-04-05T23:25:30+5:30
गावांची होरपळ सुरूच : रुग्णालय, शाळांमध्ये नागरिक, विद्यार्थ्यांचे हाल
दौंड : दौंड तालुक्यात बहुतांशी भागांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी आणि पदाधिकारी गुंतलेले असल्याने टंचाई निवारणाकडे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती आहे. तर, काही भागांत पाणीटंचाई दूर करण्यासाठी अधिकाऱ्याकडून विलंबदेखील होत आहे.
दौंड शहर आणि ग्रामीण भागात पाण्याची टंचाई जाणू लागली आहे. दौंड शहरातील काही भागात कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे पाणीटंचाई आहे. तर दुसरीकडे, ग्रामीण भागातील तलाव आटल्याने ठिकठिकाणी पाणीटंचाई सुरू आहे. पाटस येथे आठ दिवसांपासून पाणीटंचाई आहे. अशीच परिस्थिती इतर गावांत आहे. त्यामुळे जनतेच्या पाणीप्रश्नावर राजकीय पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. तसेच, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी शासकीय कामकाज म्हणून निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. तेव्हा पाणीप्रश्नावर आलेले प्रस्ताव प्रलंबित आहेत. शासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी या दोघांच्या संगनमताने जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत ग्रामपातळीवर कामकाज सुरू असते. मात्र, अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी यांचा मेळ बसत नसल्याने पाणीप्रश्नासंदर्भात आलेल्या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने बहुतांशी भागात पाणीटंचाई सुरू आहे. पाणीप्रश्नावर आणीबाणी आली, तर तेथे तातडीने पाणीप्रश्न सोडविला जात आहे.
४दौंड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाण्याची टंचाई लक्षात घेता, तातडीने रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने टँकर सुरू करण्यात आला. असाच निर्णय ग्रामीण भागातील पाणीटंचाईबाबत घेणे गरजेचे आहे.
४सध्याच्या परिस्थितीत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे बहुतांशी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी सदस्य निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले आहेत.