भीमा नदीवर ढापे बसविण्यास विलंब
By admin | Published: February 21, 2017 01:51 AM2017-02-21T01:51:06+5:302017-02-21T01:51:06+5:30
देऊळगावराजे (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या कोल्हापूर बंधाऱ्यावरील ढापे जलसंपदा विभागाने अद्याप बसवले नाही
देऊळगावराजे : देऊळगावराजे (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या कोल्हापूर बंधाऱ्यावरील ढापे जलसंपदा विभागाने अद्याप बसवले नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईला दौंडच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
या भागातील शेतकरी नेहमीच दुहेरी संकटात सापडला आहे. गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात भीमा नदीचे पात्र कोरडे पडले होते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी भामा-आसखेडचे पाणी सोडण्यात आले. परंतु ते पाणी दौड तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतातील गहू, हरभरा, ऊस यांसारखी उभी पिके जळून चालली. या वर्षी पाणी असूनही ढापे न टाकल्याने देऊळगावराजेच्या बंधाऱ्यात दोन अडीच फूट पाणी शिल्लक आहे.
पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. येथील शेतकरी सांगतात, फेबुवारी महिना संपत आला तरीसुद्धा अद्याप ढापे टाकले नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यात काही ढापे वाहून गेले आहे आणि त्यातील काही ढाप्यांचे पत्रे निकामी झाले आहेत. त्यामुळे जरी ढापे टाकले तरी त्या ढाप्यातून पाणीगळती चालू राहील. परिणामी पाण्याच्या संदर्भात गेले दिवस पुढे येतील काय, अशी भीती येथील शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. तेव्हा संबंधितांनी याकडे लक्ष देऊन वेळीच नवीन ढापे टाकावेत, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.