शासनाच्या पोर्टलवर कोरोना मृतांच्या नोंदणीस विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:42+5:302021-06-16T04:12:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूची नोंद करताना शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर, कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मृत्यूची ...

Delay in registration of Corona dead on government portal | शासनाच्या पोर्टलवर कोरोना मृतांच्या नोंदणीस विलंब

शासनाच्या पोर्टलवर कोरोना मृतांच्या नोंदणीस विलंब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनामुळे आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूची नोंद करताना शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर, कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मृत्यूची नोंद ही केवळ आकड्यांमध्ये नव्हे, तर एक-एक मृत्यूशी तपशीलवार माहिती भरून करावी लागत आहे़ यामुळे दैनंदिन कळविले जाणारे मृत्यू जास्त असले, तरी नोंद होऊन पोर्टलवर येणारी मृत्यूची आकडेवारी तपशील भरण्यास लागणाऱ्या कालावधीमुळे साधारणत: ६०० ते ७०० मृत्यूने कमी असल्याचे दिसून आले आहे़

पुणे महापालिकेकडील दिवसभरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा व मृत्यूच्या आकड्यांबाबतची माहिती घेतली असता महापालिकेकडून दररोज सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील रोजची आकडेवारी जाहीर केली जाते़ मात्र, ही आकडेवारी शासनाच्या पोर्टलवर भरून चालत नाही़ तर यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला, याचा सर्व तपशील भरावा लागत आहे़ यामध्ये सदर रुग्ण रुग्णालयात कधी दाखल झाला त्याच्यावर किती दिवस उपचार सुरू होते, त्याला कोणती उपचार पद्धती दिली, त्या रुग्णाला अन्य कुठले आजार होते का आदी मोठी प्रश्नांची उत्तरे या पोर्टलवर नोंद केल्यावर कोरोनाबाधित मृत्यूची नोंद पोर्टलवर होते.

परिणामी, महापालिकेने जाहीर केलेली आकडेवारी लागलीच शासनाकडे गेली, तरी पोर्टलवर ही तपशीलवार माहिती भरण्यास काही कालावधी लागतो़ यातच सर्वच रुग्णालयांकडून ही सविस्तर माहिती प्राप्त होण्यास लागणारा कालावधीही कारणीभूत आहे़ यामुळे आतापर्यंत प्रत्यक्ष मृत्यू व जाहीर केलेले मृत्यू यामध्ये तफावत दिसून येत असली, तरी केवळ नोंदीसाठी लागणाऱ्या कालावधीमुळे ही तफावत दिसून येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे़ मृत्यू लपविण्याचा यामागे कोणताच दावा नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे़

दरम्यान, शासनाच्या पोर्टलवर केवळ पुणेच नव्हे तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आपल्या-आपल्या भागातील नोंदी भरत असतात़ यामुळे हे पोर्टल अतिशय संथगतीने कार्यरत राहत असल्याने लागलीच या पोर्टलवर नोंदी दिसून येत नसल्याचेही अनुभवातून दिसून आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे़

---------------------

Web Title: Delay in registration of Corona dead on government portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.