सरकारच्या वेळकाढूपणामुळे आरक्षणाला विलंब - गोपीचंद पडळकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 12:39 AM2018-11-10T00:39:54+5:302018-11-10T00:40:28+5:30
कळस : धनगर आरक्षणाला आदिवासी समाजाचा विरोध मावळला असून, सरकारच्या वेळकाढूपणामुळे आरक्षणाला विलंब होत आहे. सरकारने आदिवासी समाजाच्या नेत्यांची ...
कळस : धनगर आरक्षणाला आदिवासी समाजाचा विरोध मावळला असून, सरकारच्या वेळकाढूपणामुळे आरक्षणाला विलंब होत आहे. सरकारने आदिवासी समाजाच्या नेत्यांची आमच्यासोबत एक तासाची बैठक घेतल्यास, आम्ही धनगर समाजाला आरक्षण देणे कसे शक्य आहे ते स्पष्ट करू. भाजपा सरकारने आरक्षण न दिल्यास यापुढे झेंडा आमचा असेल, त्याचा दांडाही आमचाच असेल. नेताही आम्हीच निवडून देऊ, अशी भूमिका धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली.
रुई (ता. इंदापूर) येथे बाबीरदेवाच्या यात्रेनिमित्त अमोल भिसे मित्र मंडळातर्फे गजढोल स्पर्धा व बाबीर भाविकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केले. या वेळी कार्यक्रमाला आमदार दत्तात्रेय भरणे, उत्तमराव जानकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादीचे प्रदेश युवक उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष व स्पर्धेचे आयोजक अमोल भिसे आदी उपस्थित होते. समाजातील तरुण उच्च पदस्थ अधिकारी होण्यासाठी,
सत्तेत वाटा मिळण्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे.
यामुळे येणाऱ्या चार महिन्यांत प्रत्येकाने जागे राहिले पाहिजे. आगामी विधानसभेला इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रस्थापितांनी त्यांना डावलण्याचा प्रयत्न केल्यास इतर ठिकाणी अडचणीत आणण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
तर धनगर समाजाचे ९० आमदार
राज्यात पिढ्यान् पिढ्या प्रस्थापितांचे राज्य आहे. सत्ता कायम घरात राहण्यासाठी ठराविक प्रस्थापित सतत कार्यरत असतात. लोकसंख्येच्या तुलनेत राज्यातील सत्तेत वाटा मिळाल्यास सुमारे ९० आमदार हे धनगर समाजाचे असतील. एखादा-दुसरा समाजाचा आमदार झाल्यास त्याचीही कोंडी करण्याचे काम सत्ताधारी करीत असतात. मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाºयांना पत्र काढून धनगड व धनगर हे एकच असून, मराठी व इंग्रजी भाषेतील उच्चारांचा विपर्यास केला आहे. यामुळे अनुसूचित जमातीचे दाखले देण्याचे आदेश द्यावेत. मात्र, धनगर समाजासाठी आरक्षणाची घटनेत तरतूद असताना केंद्र शासनाकडे शिफारस करण्याबाबत चुकीचे धोरण अवलंबिले जात असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका, जलसंधारणमंत्री राम शिंदे
कळस : धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यास भाजपा सरकार कटिबद्ध असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे स्पष्टीकरण जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.
रुई (ता. इंदापूर) येथील बाबीर यात्रेमध्ये अमोल भिसे मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गजढोल स्पर्धा व बाबीर भक्तांच्या मेळाव्यानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, सभापती प्रवीण माने आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत गेल्या सरकारकडून बºयाच वर्षांपासून आशा ठेवल्या होत्या. पण आरक्षण मिळाले नाही. आता समाजाने आमच्याकडून अपेक्षा ठेवल्या आहेत. पण आमच्याकडून अपेक्षाभंग होणार नाही याची खात्री देतो. आम्ही जरी सध्या सत्तेत असलो, तरी समाजाच्या पाठबळामुळेच हे शक्य झाले आहे. यामुळे समाजाच्या आरक्षणाच्या विषयाबाबत आपणही नेहमी समाजाच्या बाजूने असू असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
बाबीर देवाची यात्रा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे येथे मूलभूत सुविधा उभारण्याची गरज आहे. सध्या केलेले नियोजन उत्तम आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेली कामेही उल्लेखनीय आहेत. मात्र, पुढील वर्षी याबाबत अधिक चांगल्या सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने बैठक घेऊन नियोजन केले जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. या वेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सात कोटींचा विकास निधी आणून देवस्थान व गावाचा कायापालट केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेतील. आरक्षणाचा प्रश्न जटिल असल्याने, निर्णयाला वेळ लागत आहे.
- राम शिंदे, जलसंधारणमंत्री, महाराष्ट्र राज्य.