विभागीय आयुक्तांच्या परिपत्रकानुसार कामात दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:42+5:302021-06-30T04:08:42+5:30
पळसदेव : ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची नोंद घेवून त्यांच्याकडून कर वसूल करण्याचे परिपत्रक विभागीय आयुक्तांनी काढले आहे. मात्र ...
पळसदेव : ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची नोंद घेवून त्यांच्याकडून कर वसूल करण्याचे परिपत्रक विभागीय आयुक्तांनी काढले आहे. मात्र पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्या परिपत्रकाला केराची टोपली दाखविली असल्याचा आरोप येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मेघराज कुचेकर यांनी केला असून त्याबाबत त्यांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
विभागाय आयुक्तांनी १५ मे २०१९ रोजी जारी केलेल्या पत्रकामध्ये सूचना दिल्या होत्या की, ग्रामपंचायतींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिकृत व अनाधिकृत इमारतींची नमुना नं. ८ ला नोंद घ्यावी आणि कर वसूलीस पात्र मिळकतींकडून कर वसूल करावेत. इमारतींच्या नोंदी पूर्ण केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांना काम पूर्ण झालेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचेही नमदू करण्यात आले होते. ते परिपत्रक विभागीय आयुक्तांनी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्हा परिषदांना दिले आहे. मात्र पळसदेव येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांनी परिपत्रकानुसार अनधिकृत बांधकामांची नोंद करण्याच्या कामास फाटा दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामात दिरंगाई केल्याच्या कारणास्तव कारवाई करण्यात अशी मागणी केली अन्यथा मागणीसाठी ७ जुलैला ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
---
परिपत्रकानुसार बांडेवाडी भागातील नोंदीचे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती पळसदेव, काळेवाडी नं १ चे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे सदर कामात खंड पडला आहे. अनेकवेळा शासकीय आदेशानुसार कामावर पन्नास टक्के कर्मचारी उपस्थिती यामुळे या कामात अडथळा आला आहे. मात्र हे काम लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- डी. पी. भुजबळ,
ग्रामविकास अधिकारी, पळसदेव
मागील सरपंच यांच्या काळापासून अनधिकृत बांधकामाच्या नोंद घेण्याचे काम सुरु आहे . मात्र कोरोना परिथितीमुळे सध्या नोंदीच्या कामाचा वेग मंदावला आहे . परिस्थिती सर्वसाधारण झाल्यावर लवकरात लवकर नोंदीचे काम पूर्ण करण्यात येईल
- इंद्रायणी मोरे, सरपंच
————————————————