Maharashtra Rain: पावसाचे आगमन लांबणीवर! महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 08:20 PM2023-06-05T20:20:35+5:302023-06-05T20:21:06+5:30
१६ जून ते २२ जून या आठवड्यात मान्सून सबंध महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता
पुणे: अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रावाताच्या स्थितीमुळे नैऋत्य मोसमी पावसाची अर्थात मान्सूनची प्रगती अद्याप खुंटलेलीच आहे. केरळमध्ये अजूनही त्याचे आगमन केव्हा होईल, याबाबत अद्याप स्थिती स्पष्ट नसल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. मात्र विस्तारित अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरीस केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होईल’, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने पूर्वी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, केरळमध्ये ४ जूनच्या आसपास मान्सून दाखल होईल, अशी शक्यता होती. मात्र, अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रावाताच्या स्थितीमुळे हे आगमन लांबले आहे. मान्सूनचे केरळातील आगमन हे तेथील १४ केंद्रांवर झालेल्या पावसावर आधारित असते. या चौदाही केंद्रांवर पावसासाठी अनुकूल स्थिती असली तरी केवळ एका केंद्रावरच सध्या पाऊस सुरू आहे. मात्र, या दोन्ही समुद्रांतील प्रणालीमुळे हे आगमन केव्हा होईल, याबाबत अजूनही स्पष्टता तयार झालेली नाही, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली.
ते म्हणाले, ‘दक्षिण पूर्व अरबी समुद्रात तयार झालेली चक्रावाताची स्थिती पुढील २४ तासांत अर्थात मंगळवारी (दि. ६) अधिक तीव्र होऊन त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल. त्यानंतरच्या दोन दिवसांत हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडून सरकून दक्षिणपूर्व व लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तीव्र बनण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत हे दोन्ही पट्टे उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यानंतरच मान्सूनसाठी चांगली स्थिती तयार होईल.’
सबंध राज्यात मान्सून व्यापेल १६ ते २२ जूनदरम्यान
हवामान विभागाने जारी केलेल्या विस्तारित अंदाजानुसार, जूनच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो, तर महाराष्ट्राचा विचार केल्यास दक्षिण महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होऊ शकतो. व १६ जून ते २२ जून या आठवड्यात मान्सून सबंध राज्य व्यापण्याची शक्यता आहे.