पुण्यात संथगतीने मतदान; दुपारपर्यंत कसब्यात 18.5 टक्के तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 02:21 PM2023-02-26T14:21:16+5:302023-02-26T14:25:44+5:30
जास्तीजास्त मतदारांना मतदानासाठी आणण्याचे राजकीय पक्ष आणि प्रशासनासमोर आव्हान
पुणे : विधानसभेच्या कसबा व चिंचवड या दोन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात, तर चिंचवडमध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे व बंडखोर अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. परंतु दोन्हीकडे मतदान अत्यंत संथगतीने चालल्याचे निदर्शनास आले आहे. दुपारपर्यंत कसब्यात 18.5 टक्के तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदान झाले आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीमध्ये मतदानासाठी नागरिकांचा प्रतिसाद कमी असल्याचे दिसून आले आहे. दुपारी १ वाजेपर्यंत कसब्यात अवघे १८ टक्के तर २० टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे जास्तीजास्त मतदारांना मतदानासाठी आणण्याचे आव्हान राजकीय पक्ष आणि प्रशासनासमोर आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवारी) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत २०.६८ टक्के मतदान झाले. त्यामध्ये ६९ हजार ८३८ पुरुषांचा समावेश आहे. तर ४७ हजार ८४१ महिलांचा समावेश आहे. दुपारपर्यंत १ लाख १७ हजार ६८० मतदारांनी मतदान केले आहे. पहिल्या दोन तासात सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ३.५२ टक्के मतदान झाले होते. तर नंतर ११ वाजेपर्यंत १०.४५ टक्के एवढे मतदान झाले. तर त्यानंतर एक वाजेपर्यंत २०. ६८ टक्के मतदान झाले.
२ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसब्यातील मतमोजणी कोरेगाव मार्क येथील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. चिंचवडमधील मतमोजणी कामगार भवन, थेरगाव इथे होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडी व महायुतीने निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे निकालाबाबत पुणे जिल्ह्यालाच नाही, तर राज्यालाही उत्सुकता आहे.