शिरूर बाजार समितीत सुविधांचा बोजवारा

By Admin | Published: May 23, 2017 05:23 AM2017-05-23T05:23:21+5:302017-05-23T05:23:21+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार अस्वच्छतेचे केंद्र असून नियोजनाच्या अभावामुळे तसेच संचालक मंडळाच्या मनमानीमुळे या समितीवर कोणाचे नियंत्रण आहे

Deletion of facilities in Shirur Market Committee | शिरूर बाजार समितीत सुविधांचा बोजवारा

शिरूर बाजार समितीत सुविधांचा बोजवारा

googlenewsNext

प्रवीण गायकवाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर : कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार अस्वच्छतेचे केंद्र असून नियोजनाच्या अभावामुळे तसेच संचालक मंडळाच्या मनमानीमुळे या समितीवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असे चित्र आहे. समितीहितापेक्षा स्वहिताकडे जास्त लक्ष दिल्याने समितीत या समस्येबरोबरच आर्थिक समस्याही निर्माण झाली आहे. समिती शेतकऱ्यांसाठीआहे, मात्र या समितीतून शेतकरी हद्दपार होतो की काय, अशी परिस्थिती आहे.
शहरातून गेलेल्या पुणे-नगर रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय, व्यापारी संकुल आहे. पाबळ फाट्याजवळ समितीचे व्यापारी संकुल आहे. जांबूत येथे उपबाजार आहे. पिंपळे-जगताप येथील जागेतही व्यापारी संकुल आहे. शहरातच व्यापारी गाळे, मोकळी जागा मिळून जवळपास ४२५ भोगावटादार आहेत. जांबूत येथे ८० गाळे आहेत. पिंपळे जगतापची जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. समितीच्या सूत्रानुसार समितीला सध्या भाडेपट्ट्याच्यामाध्यमातून सुमारे ३७ लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे. इतरही माध्यमातून समितीला उत्पन्न मिळत असून शासनाच्या विविध योजनांतून विविध कामांसाठी निधी मिळत आहे. असे असताना समिती सध्या तोट्यात आहे.
यामुळे की काय जुन्या व्यापारी संकुल (समिती कार्यालय) आवारात घाणीचे साम्राज्य दिसून येते.
मोकाट जनावरांचा येथे अड्डा निर्माण झाला आहे.
पूर्वी ज्या ठिकाणी शेतकरी निवास होते, त्यांच्या बाजूला प्रचंड घाण असून या घाणीत जनावरे बसलेली असतात.
एम. एस. ई. बी. कार्यालयासमोरील गेटच्या आत आल्यावर डाव्या बाजूला प्रचंड घाण आहे. येथेही मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. स्वच्छतागृहात तर पाऊल ठेवणे कठीण जाते, इतके ते अस्वच्छ आहे. आवारातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या समस्या सोडविण्यासाठी कदाचित समितीकडे पैसे नसावेत. समितीच्या आवारात अडत व्यावसायिकांची होलसेल दुकाने आहेत. लीजवर ही दुकाने देण्यात आली आहेत.
या दुकानांसमोर व इतरत्र दर शनिवारी आठवडेबाजार भरतो. या दिवशी आलेल्या प्रत्येक शेतकरी, विक्रेत्यांकडून पैसे घेतले जातात. मात्र त्यांना दगडगोट्यात बसावे लागते. पैसे घेतले जात असतील तर त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. मात्र शेतकऱ्यांच्या कोणत्याच प्रश्नांकडे समिती गांभीर्याने लक्ष देत नाही, हे वेळोवेळी दिसून आले आहे. शेतकऱ्यांना राहण्यासाठी विश्रांतीसाठी शेतकरी निवास बांधण्यात आलेले आहे. मात्र हे निवास बंद करून तेथे व्यावसायिकांना जागा देण्यात आली आहे. शेतकरी बाजारासाठी जागा देण्यात आली आहे. मात्र त्याच्या स्वच्छतेकडेही कोणाचे लक्ष नाही. जेव्हा एखाद्या इमारतीत व्यापारी गाळे भाड्याने दिले जातात.
तेथे सर्वांकडून मेंटेनन्सचा खर्च घेतला जातो. यातून स्वच्छता व इतर कामे केली जातात. याचप्रकारची अंमलबजावणी बाजार समिती का करीत नाही, हा प्रश्न आहे. ज्या दिवशी बाजार भरतो (आठवडेबाजार) त्या दिवशी संध्याकाळी त्या भागात सफाई केली जाते. मात्र ज्या ठिकाणी कायमची घाण असते, त्या ठिकाणी लक्ष दिले जात नाही. स्वच्छतेसाठी समितीकडे निश्चित तरतूद आहे. मात्र त्याचा वापर का केला जात नाही, हा प्रश्न आहे.

Web Title: Deletion of facilities in Shirur Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.