गुंतवणूकदाराला १० लाखांचा गंडा घालणाऱ्याला दिल्लीतून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:13 AM2021-09-22T04:13:27+5:302021-09-22T04:13:27+5:30
पुणे : बंद पडलेल्या कंपनीतील १ लाखांची गुंतवणूक व्याजासह मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदाराला पावणेदहा लाखांना गंडा घालणाऱ्याला सायबर ...
पुणे : बंद पडलेल्या कंपनीतील १ लाखांची गुंतवणूक व्याजासह मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदाराला पावणेदहा लाखांना गंडा घालणाऱ्याला सायबर पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे.
दीपक राकेश शर्मा (वय ३१, रा. नोएडा) या सायबर चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यासह १३ जणांवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी लोहगाव येथील एका गुंतवणूकदाराने फिर्याद दिली आहे. ही घटना फेब्रुवारी २०१९ ते मे २०२० दरम्यान ऑनलाइन घडली. फिर्यादी यांनी एका कंपनीत ४ वर्षे मुदतीवर १ लाख रुपये गुंतवले होते. ही कंपनी बंद पडल्याने, त्यातील गुंतवलेली रक्कम परत देण्याच्या बहाण्याने आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईलवरून फिर्यादींना फोन केले आणि गुंतवणुकीची रक्कम व्याजासहित परत देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांना विविध बँक खात्यांवर वेळोवेळी रक्कम भरायला लावून ९ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक केली.
सायबर पोलिसांनी आरोपीला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. हा गुन्हा करण्यामागे मोठ्या टोळीचा हात असण्याची शक्यता आहे. आरोपीच्या नावे असलेल्या बँक खात्यात गुन्ह्यातील ३० हजार रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम हस्तगत करायची आहे. तसेच पुढील तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.