दिल्लीला मुजरा करायला जात नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: January 6, 2024 09:27 PM2024-01-06T21:27:23+5:302024-01-06T21:28:58+5:30
शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा किवळे येथे शनिवारी झाला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
पिंपरी : सध्याचे महायुती सरकार विकासाचा मुद्यावर काम करत आहे. दोन दिवसाला आम्ही दिल्लीला जातो, यामुळे काहींच्या पोटात पोटशूळ उठत आहे. मात्र, आम्ही दिल्लीला मुजरा करायला जात नाही तर विकासकामे मंजूर करून आणायला जातो, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.
शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा किवळे येथे शनिवारी झाला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, इरफान सय्यद, शीतल म्हात्रे, बाळासाहेब वाल्हेकर आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, मी फिल्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे. महाविकास आघाडी काळात अहंकारी माणसामुळे राज्याचा विकास खुंटला होता. या सरकारमुळे राज्याला केंद्राचे पाठबळ मिळत आहे. दीड वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नाही. सर्वसामान्यांच्या आयुष्यात अच्छे दिन आणण्यासाठी आहे. महायुती मजबूत आहे. इंडी आघाडीकडे नेतृत्व नाही. मात्र, महायुतीकडे नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे २०२४ ला महायुतीचे सरकार नक्कीच येणार आहे.
मुंबईसह महाराष्ट्र स्वच्छ करू...
शिंदे म्हणाले, दीड वर्षांमध्ये जे काम केले त्याची पोचपावती जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत दिली. या राजकीय दलदलीत फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्र स्वच्छ करून आम्ही थांबू, असा इशाराही शिंदे यांनी दिला. आज सभेला जेवढे उपस्थित होते तेवढे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर महाविकास आघाडीचे डिपॉझिट जप्त होईल.
---
सर्वसामान्यांना आनंद झाला...
शिंदे म्हणाले, सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा काहींना भविष्याविषयी चिंता होती. मात्र, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सोबत घेऊन निघालो. म्हणून आज सत्तेत आहोत. मी मुख्यमंत्री झाल्याचे सर्वसामान्य नागरिकांना आनंद झाला. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, या बाळासाहेबांच्या शब्दाला जागलो. शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी मी धाडसी निर्णय घेतला. गहाण ठेवलेला धनुष्यबाण वाचवला, असे ते म्हणाले.
शास्ती रद्द करून दाखवला..
शिंदे म्हणाले, २०१९ ला श्रीरंग बारणे यांना शब्द दिला होता. पिंपरी-चिंचवड शहारातील शास्ती कर रद्द केला. तसा अनधिकृत बांधकामाचा प्रश्नही मार्गी लावू. इंद्रायणीबरोबरच इतर नद्यांचाही डीपीआर तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.