पुण्यातील विमान प्रवाशांसाठी 'दिल्ली दरवाजा' उघडला जाणार सकाळी १० नंतरच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 12:13 PM2020-10-27T12:13:17+5:302020-10-27T12:26:46+5:30
विमान कंपन्या व अन्य खासगी कंपन्यांच्या बुकींग संकेतस्थळांवर बदललेल्या वेळांनुसारच विमानांचे तिकीट बुकींग करता येत आहे.
पुणे : धावपट्टीच्या दुरूस्तीच्या कामासाठी विमानतळ रात्री बंद राहणार असल्याने पुण्यातून दिल्लीसाठीचे पहिले विमान सकाळी ८.०५ वाजता उड्डाण करणार आहे. हे विमान सकाळी १०.१५ दिल्ली विमानतळावर उतरेल. त्यामुळे पुण्यातील विमान प्रवाशांसाठी दिल्ली दरवाजा थेट १० नंतरच उघडला जाणार आहे. तर सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी शेवटचे उड्डाण असणार आहे.
लोहगाव येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या अस्तरीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी सोमवार (दि. २६) पासून विमानतळ रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत बंद राहणार असल्याने विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यावेळेतील विमानांची उड्डाणे दिवसभरातील विविध वेळांमध्ये बदलण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी यापुर्वीच दिली होती. पण हे बदल केले तरी पुण्यातील पहिले उड्डाण सकाळी ८ नंतरच होणार असल्याने अन्य शहरांमध्ये पोहचण्यासाठी जवळपास दहाच वाजणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या दैनंदिन कामांचे नियोजन कोलमडण्यासह आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे.
विमान कंपन्या व अन्य खासगी कंपन्यांच्या बुकींग संकेतस्थळांवर बदललेल्या वेळांनुसारच विमानांचे तिकीट बुकींग करता येत आहे. पुण्यातून सर्वाधिक विमानांचे उड्डाण दिल्लीकडे होते. पुण्यातून दिल्लीचे पहिले विमान सकाळी ८.०५ वाजता उड्डाण करेल. हे विमान १० वाजून १५ मिनिटांनी दिल्लीत उतरेल. दिवसभरात थेट ११ विमाने दिल्लीला जातील. पण पुण्यातून दिल्लीत जाणारे अनेक उद्योजक, कंपन्यांचे अधिकारी, गुंतवणुकदार, राजकीय नेते, पर्यटक तसेच दिल्लीतून अन्य शहरांसाठी विमानाने प्रवास करणारे प्रवासी आदींना दिल्लीत पोहचण्यासाठी सव्वा दहा वाजणार आहेत. विमानतळावरून बाहेर पडण्यासह इच्छितस्थळी जाण्यासाठी त्यांना पुढे किमान एक ते दीड तास लागु शकतो. या वेळांनुसारच पुण्यातून दिल्ली किंवा अन्य शहरांमध्ये जाणाऱ्यांना कामाचे नियोजन करावे लागणार आहे.
--------------
दिल्लीतून पुण्यात येण्यासाठी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी पहिले तर सायंकाळी साडे पाच वाजता शेवटचे विमान आहे. त्यामुळे एका दिवसात पुणे-दिल्ली-पुणे असा प्रवास करायचा असल्यास विविध कामांसाठी केवळ पाच ते सहा तासांचाच वेळ मिळतो. त्यातच सकाळी विमानाला विलंब झाल्यास हा वेळ आणखी कमी होईल. तर दिल्लीतून विमान उड्डाणाला ३० मिनिटे विलंब झाला तरी ते रद्दच करावे लागणार आहे. असे झाल्यास दिल्लीत मुक्काम करावा लागू शकतो. तसेच दिल्लीतून सकाळी १० पुर्वी अन्य विमान पकडायचे असल्यास पुण्यातून आदल्यादिवशी सायंकाळी ७.४० चे शेवटच्या विमानानेच दिल्ली गाठावी लागेल.
--------------
पुण्यातून विमान उड्डाणांची स्थिती (दि. २७ ऑक्टोबर)
पुणे ते दिल्ली - उड्डाण सकाळी ८.०५, उतरणार १०.१५
उड्डाण सायं. ७.४०, उतरणार रात्री ९.४५
दिल्ली ते पुणे - उड्डाण सकाळी ६.३०, उतरणार सकाळी ८.४०
उड्डाण सायंकाळी ५.३०, उतरणार सायंकाळी ७.३५
पुणे ते हैद्राबाद - पहिले उड्डाण दुपारी २.१५, शेवटचे ६.१०
पुणे ते नागपुर - उड्डाण दुपारी १.५०
पुणे ते बेंगलुरू - पहिले उड्डाण दुपारी ४, शेवटचे सायंकाळी ७.४५
पुणे ते चेन्नई - पहिले उड्डाण सकाळी ८.४५, शेवटचे सकाळी ९.१०