राज्यातील शाळांसाठी दिल्ली पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:16 AM2021-09-16T04:16:07+5:302021-09-16T04:16:07+5:30
पुणे : राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा अधिक सुधारण्यासाठी दिल्ली पॅटर्न राबविला जाणार आहे. ...
पुणे : राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा अधिक सुधारण्यासाठी दिल्ली पॅटर्न राबविला जाणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांचा अभ्यास गटही स्थापन केला असून हा गट दिल्लीतील शाळांना भेट देऊन राज्य शासनाला अहवाल सादर करणार आहे.
गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा झाली असून याचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांवर झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे काही शाळांना आयएसओ मानांकनही मिळाले आहे. शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत अधिक सुधारणा करून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शिक्षण देणे ही काळाजी गरज आहे. दिल्लीतील सर्व शाळांमध्ये काळानुरुप शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी बदल व सुधारणा करण्यात आल्या आहेत.
दिल्लीतील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेले शैक्षणिक वातावरण,वापरले जाणारे तंत्रज्ञान, विद्यार्थी, शिक्षकांसाठी असणाऱ्या सुविधा, शिक्षकांच्या शिकविण्याची विविध कार्यपद्धती आदी सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करण्याकरिता सात जणांचा अभ्यासगट तयार केला आहे.या अभ्यासगटाला दिल्लीत पाठविण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, सेवानिवृत्त विशेष लेखा परीक्षक आर. एस. शेख, सोयगावमधील माणिकराव पालोदकर विद्यालयातील सहशिक्षक काशिनाथ पाटील, अहमदनगरमधील गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, सिल्लोडमधील जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षक जगन सुरसे, वडगाव कोण्हाटी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनील चिपाटे यांचा समावेश केला आहे.