दिल्लीच्या पथकाकडून पिंपरी चिंचवड-दापोडी मेट्रो मार्गाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:12 AM2021-07-07T04:12:55+5:302021-07-07T04:12:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कमिशनर ऑफ सेफ्टी या दिल्लीस्थित केंद्रीय कार्यालयाच्या पथकाने महामेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते दापोडी या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कमिशनर ऑफ सेफ्टी या दिल्लीस्थित केंद्रीय कार्यालयाच्या पथकाने महामेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते दापोडी या मार्गाची रविवारी दुपारी पाहणी केली. महामेट्रोकडून या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते करण्याचा विचार असून, त्यासाठी १६ ऑगस्टचा मुहूर्त गाठण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.
देशभरातील रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरक्षित व्हावी, यासाठी कमिशनर ऑफ सेफ्टी हे स्वतंत्र कार्यालय दिल्लीत आहे. त्यांच्या लिखित प्रमाणपत्राशिवाय कोणतीही रेल्वे सुरू होत नाही. या कार्यालयाच्या एका पथकाने रविवारी दुपारी महामेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते दापोडी या मार्गाची पाहणी केली.
मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीनेच ही पाहणी होती.
हा मार्ग ५.६ किलोमीटरचा आहे. त्यावर ५ स्थानके आहेत. त्यातील संत तुकाराम नगर, फुगेवाडी या स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित स्थानकांचीही किरकोळ कामे बाकी आहेत.
पथकातील अधिकाऱ्यांनी संपूर्ण मार्गाची मेट्रोत बसून पाहणी केली. स्थानकातील सुविधाही त्यांनी तपासून पाहिल्या. मेट्रोचा वेग किती ठेवायचा यापासून सर्व अधिकार या पथकाला आहेत. त्यांनी प्रमाणित केल्याशिवाय मेट्रो सुरू करता येत नाही. पथकाने महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना बऱ्याच सूचना केल्याची माहिती मिळाली. त्याची त्वरित पूर्तता करण्यात येईल, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. आता १५ दिवसांनी पुन्हा पाहणी करण्यात येईल, अशी माहिती मिळाली.