Delhi Violence : सुप्रिया सुळेंनी केली अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 04:41 PM2020-02-25T16:41:24+5:302020-02-25T18:56:08+5:30
दिल्लीमध्ये उसळलेल्या पार्श्वभूमिवर हे केंद्र सरकारचे अपयश असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
पुणे : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीत आलेले असताना हिंसाचार होणे धक्कादायक आहे. हे गुप्तचर विभागाचे अपयश असून याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण द्यावे अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
पुणे पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेल आणि सेवा केंद्राला भेट देत त्यांनी माहिती घेतली. त्यावेळी त्या बाेलत हाेत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर असताना दिल्लीमध्ये दंगल होणे धक्कादायक आहे. हे केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाचे खूप मोठे अपयश आहे. गुप्तचर यंत्रणांमध्ये कुठे दोष होते याबद्दलची चौकशी व्हायला हवी. तसेच गृहमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवे. यामुळे देशाचे नाव खराब होत असून याबाबत गृहमंत्र्यांकडे उत्तर नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी ट्रम्प यांच्यासोबत राष्ट्रपतींनी आयाेजित केलेल्या स्नेह भाेजनाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, त्यांनी हा निर्णय का घेतला हे तेच सांगू शकतील. परंतु ट्रम्प यांच्या भेटीत सरकारने विराेधी पक्षांना फारसे सामावून घेतले नाही. बराक ओबामा जेव्हा भारत भेटीवर आले हाेते त्यावेळी मनमाेहन सिंह यांनी सर्व विराेधी पक्षीयच्या नेत्यांना बैठकींना बाेलावले हाेते.