किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात दिल्लीचे लक्ष; सीआयएसएफचे अधिकारी पुण्यात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 08:09 PM2022-02-08T20:09:23+5:302022-02-08T20:09:36+5:30
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र निघून घटनाक्रम कळवला होता. त्यानंतर आता या प्रकरणात दिल्लीने लक्ष घातले आहे.
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांना शनिवारी पुणे महानगरपालिका मारहाण झाली. जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची माहिती घेण्यासाठी ते पुणे महानगरपालिकेत आले होते. परंतु महापालिका आयुक्तांना भेटण्यापूर्वीच शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की केली होती. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कलमं न लावल्याचा आरोप करीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र निघून घटनाक्रम कळवला होता. त्यानंतर आता या प्रकरणात दिल्लीने लक्ष घातले आहे.
किरीट सोमय्या यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती घेण्यासाठी दिल्लीतून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत. या अधिकाऱ्यांनी आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे किरीट सोमय्या त्यांच्यावर पुढे महानगरपालिकेत झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्लीनेही लक्ष घातल्याचे उघड झाले आहे.
शनिवारी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 60 ते 70 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल आहे. त्यातील काही शिवसैनिक आज शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाले होते. अटक करून त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले होते. तसेच आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून किरीट सोमय्या सोबत झालेला प्रकार कळवत लक्ष घालण्याची मागणी केली होती.