स्मार्ट पुण्यावर दिल्लीच्या तीन पुरस्कारांची मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 09:06 PM2018-05-26T21:06:39+5:302018-05-26T21:06:39+5:30
दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात एक्झिबिशन इंडिया ग्रुपचे अध्यक्ष प्रेम बहल यांच्या हस्ते या तिन्ही पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पुणे: स्मार्ट पुण्याच्या तीन योजनांना थेट दिल्लीच्या संस्थेच्या कौतुकाची थाप मिळाली. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व पुणे महापालिका यांनी संयुक्तपणे राबवलेल्या पथदिवे यंत्रणा, स्मार्ट सिटीसाठीची विशेष उद्देश वहन कंपनी (एसपीव्ही-स्पेशल पर्पज व्हेईकल) व पाणी पुरवठा विभागातंर्गत राबवलेल्या काही योजना या तीन प्रकल्पांना स्मार्ट इंडिया सिटीज अॅवार्डस देण्यात आले. दिल्ली येथील एका कार्यक्रमात स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी हे पुरस्कार स्विकारले.
दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात एक्झिबिशन इंडिया ग्रुपचे अध्यक्ष प्रेम बहल यांच्या हस्ते या तिन्ही पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याविषयी बोलताना जगताप म्हणाले, शहरात राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने देशातील १०० शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना सुरू केली आहे. त्यात पुण्याला राष्ट्रीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळाला आहे. पुढील ३० वर्षांचे नियोजन करून स्मार्ट सिटी कंपनी महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना, उपक्रम शहरात राबवत आहे. या पुरस्कारांमुळे कंपनीला प्रेरणा मिळाली आहे. स्मार्ट सिटी अतंर्गत पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात स्मार्ट पथदिवे यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. अत्याधुनिक पद्धतीच्या या दिव्यांचे नियंत्रण करण्यासाठी स्काडा ही सिस्टिम सुरू करण्यात आली असून एकाच ठिकाणाहून हे सर्व नियंत्रण होते. ऊर्जा विभागात या योजनेला पुरस्कार मिळाला. स्मार्ट सिटी मधील विविध योजना राबवण्यासाठी महापालिकेच्या संमतीने विशेष कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीची रचना, कामकाज यालाही पुरस्कार देण्यात आला. तसेच पाणी पुरवठा विभागात पाण्याचे वितरण सुधारण्यासाठी म्हणून काही वेगळे प्रयोग करण्यात आले आहे. त्याचाही गौरव करण्यात आला.