Tasty Katta: हिरवी चटणी अन् लाल सॉस यांच्या गराड्यात छान लालचुटूक 'खमंग कटलेट'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 01:56 PM2022-12-04T13:56:21+5:302022-12-04T13:56:44+5:30

काही पदार्थ तयार करताना त्याचा पसाराच फार मोठा होतो, पण खाताना चव अशी लागते की, सगळा व्याप विसरायला होते

Delicious red 'Khamang cutlet' with green chutney and red sauce | Tasty Katta: हिरवी चटणी अन् लाल सॉस यांच्या गराड्यात छान लालचुटूक 'खमंग कटलेट'

Tasty Katta: हिरवी चटणी अन् लाल सॉस यांच्या गराड्यात छान लालचुटूक 'खमंग कटलेट'

Next

राजू इनामदार

पुणे : काही पदार्थ तयार करताना त्याचा पसाराच फार मोठा होतो, पण खाताना चव अशी लागते की, सगळा व्याप विसरायला होते. कटलेट त्यापैकीच एक आहे. बदामाच्या किंवा कसल्याही आकाराचे दोन छान लालचुटूक गोल, हिरव्या चटणीच्या, लाल सॉसच्या गराड्यात समोर येतात, तेव्हाच त्याच्या चवीचा अंदाज येतो. चमच्याने एक लहानसा तुकडा तोडून तो चटणीवर, सॉसवर टेकवून जिभेवर ठेवला की, मग खरोखरच सगळे काही विसरायला होते.

शाही थाट

कटलेट कुठून आले असावे. बऱ्याच खाद्यतज्ज्ञांच्या, म्हणजे खरे तर खवय्ये कमी व अभ्यासकच जास्त असलेल्यांच्या मते तो दक्षिणेकडील राज्यातून सगळीकडे पसरला असावा. मात्र, कटलेटचा आकार, त्याचा राजेशाही थाट पाहता, तो बहुतेक एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याच्या खानसाम्याकडून बाहेर आला असावा व प्रसिद्ध झाला असावा, असा एक अंदाज आहे.

करताना हे हवेच

तो अमुकअमुकचाच तयार केला पाहिजे, असे काहीच बंधन नाही. काही पदार्थ मात्र तो तयार करताना हमखास हवेतच. त्यापैकी एक म्हणजे ब्रेडचा चुरा व दुसरे मैद्याचे किंवा मग कॉर्नफ्लेक्सचे पातळ पीठ. हे दोन पदार्थ कटलेटसाठी लागतातच. कटलेट म्हणजे विविध भाज्या एकत्रित करून केलेला गोलाकार. त्यात कधी गाजर, बीट, फरसबी अशा भाज्या असतील, तर कधी बटाट्याच्या पिठात ढोबळी मिरची व अन्य काही भाज्या टाकलेल्या असतील. जे आवडत असेल, ते पदार्थ घ्यायचे व त्याचे बारीक तुकडे करायचे.

असे बनवितात

हे सगळे छान उकडून घ्यायचे, मीठ, मसाला, हवे असल्यास मस्त स्मॅश करायचे, म्हणजे त्याचे पीठ करायचे. अलीकडे चांदणी, बदाम किंवा अन्य काही आकारांचे साचे मिळतात. त्यात हे पीठ भरून तसे आकार काढून घ्यायचे. साचे नसतील, तर मग हातांनीच गोल किंवा अंडाकृती असे आकार केले, तरी आकर्षक दिसते. हे आकार तयार झाले की, ते मैद्याच्या किंवा कॉर्नफ्लेक्सच्या पिठात बडवून लगेच ब्रेडच्या चुऱ्यात घोळून घ्यायचे.

प्रथम दर्शनच सुखकर

हे तुकडे चांगले सोनेरी, तपकिरी होईपर्यंत तेलात तळून काढायचे. बीट जास्त टाकले असेल, तर ते मस्त लालसर दिसतात. ते नसेल, तर ब्रेडच्या चुऱ्यामुळे सोनेरी दिसतात. तळलेले हे तुकडे हिरवी, चटणी, सॉसबरोबर मांडले की देखणे दिसतात. मोठ्या हॉटेलमध्ये मेयोनीजमध्ये घोळलेली चटणी, थोडेसे फ्रेंच फ्राइज वगैरे देतात. त्यामुळे डिशचा थाट वाढतोच, शिवाय चवही छान लागते.

कुठे खाल - कर्वे रस्त्यावरील दुहेरी उड्डाणपुलाजवळ आनंद व्हेज, ग्राहक पेठेच्या शेजारी.

कधी - सकाळी ब्रेकफास्ट म्हणून किंवा मग ४ वाजताच्या भुकेच्या वेळी.

Web Title: Delicious red 'Khamang cutlet' with green chutney and red sauce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.