स्मशानभूमीच्या वायू प्रदुषणातून नागरिकांची सुटका करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:09 AM2020-12-23T04:09:16+5:302020-12-23T04:09:16+5:30
पुणे : वैकुंठ स्मशानभुमीमधून येणारा धूर आरोग्यास घातक असून या वायूप्रदुषणातून नागरिकांची सुटका करा. नागरिकांशी संवाद साधून समस्या दूर ...
पुणे : वैकुंठ स्मशानभुमीमधून येणारा धूर आरोग्यास घातक असून या वायूप्रदुषणातून नागरिकांची सुटका करा. नागरिकांशी संवाद साधून समस्या दूर करण्याच्या सूचना राष्ट्रीय हरीत लवादाने पुणे महानगरपालिकेला केल्या आहेत.
शहराच्या मध्यवस्तीतील आणि सर्वात मोठ्या वैकुंठ स्मशानभुमीभोवती मोठी लोकवस्ती आहे. याभागातील नागरिकांना येथील धूर, वायू प्रदुषणामुळे त्रास होतो आहे. गेल्या अनेक वर्षात या स्मशानभूमीची क्षमता वाढविताना देखभाल आणि दुरुस्तीची क्षमता मात्र वाढविण्यात आलेली नाही. ठेकेदारांमार्फत कामे केली जात असल्याने येथील कामाच्या दर्जाबाबत अनेकदा टीकाही केली जात आहे. पालिकेने पारंपरिक पद्धतीने लाकडांवर मृतदेहांचे ज्वलन केल्या जाणा-या गाळ्यांमध्ये धुराचे फिल्टर (चिमण्या) बसविले आहेत. परंतु, या चिमण्या कधी सुरु केल्या जातात तर कधी बंदच असतात.
यासोबतच याठिकाणी पूर्णवेळ समन्वयकही नेमण्यात आलेला नाही. विद्यूत दाहिनीमध्ये अनेकदा बिघाड होतात. धूर आकाशात जाण्यासाठी लावलेल्या मोठाल्या चिमण्या इमारतींपेक्षा कमी उंचीवर आहेत. त्यामुळे या चिमण्यांची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे. सोसायट्यांनी अनेकदा धुराचे आणि प्रदुषणाचे फोटो काढून पालिकेला पाठविले. १३० नागरिकांनी सह्या करुन पालिकेला निवेदने दिली. परंतु, त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे याबाबत आवाज उठविणारे नागरिक विक्रांत लाटकर यांनी सांगितले.
याविषयी राष्ट्रीय हरीत लवादाकडे तक्रार करण्यात आली होती. लवादाने पालिका आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधून समस्या समजावून घ्यावी, तसेच आवश्यक सुधारणा करण्याच्या सुचना केल्या आहेत.
====
वैकुंठ स्मशानभुमीमध्ये मृतदेह जाळण्याकरिता अनेकदा ओले लाकूड वापरले जाते. तर, अनेकदा फिल्टर वापरला जात नाही. याठिकाणी प्रदुषण नियंत्रण यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. यासोबतच परराज्यात वापरात असलेले आधुनिक तंत्रज्ञान आणायला हवे. धुर आणि प्रदुषणामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात वारंवार निवेदने आणि फोटो देऊनही फरक पडलेला नाही. हरित लवादाने आयुक्तांना आदेश देऊन ही समस्या दूर करण्यास सांगितले आहे.
- विक्रांत लाटकर, नागरिक