पुणे रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफाॅर्मवर महिलेची प्रसुती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 09:08 PM2019-11-01T21:08:17+5:302019-11-01T21:09:30+5:30

पुणे रेल्वे स्थानकावरील फलाटावर एका महिलेची प्रसुती झाली. तिला तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली.

delivery on platform of Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफाॅर्मवर महिलेची प्रसुती

पुणे रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफाॅर्मवर महिलेची प्रसुती

Next

पुणे : वेळ सकाळी 10.45  ची. पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांकावरतीनवर नऊ महिन्यांची गर्भवती असलेली महिला उभी..अचानक तिच्या साडीवर एका मुलाला रक्ताचे डाग दिसतात आणि तो डॉक्टरांना पाचारण करण्यासाठी तात्काळ वैद्यकीय केंद्राच्या दिशेने धाव घेतो....डॉक्टर आणि परिचारिका येतात...त्या महिलेची फलाटावरच सर्वसामान्य पद्धतीने प्रसुती होते.

हा खरंतर एका चित्रपटाला शोभेल असाच प्रसंग. पण ही घटना शुक्रवारी पुण्यात घडली आणि हजारो प्रवासी या घटनेचे साक्षीदार ठरले. सोनाली दत्ता केंद्रे ( 35 वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. पावणे अकराच्या सुमारास त्या पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 3 वर उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीवर रक्ताचे डाग असल्याचे एका मुलाच्या निदर्शनास आले. या मुलाने डॉक्टरांना पाचारण करण्यासाठी ताबडतोब वैद्यकीय केंद्राच्या दिशेने धाव घेतली.पुणे रेल्वे स्थानकातून रेल्वे अधिकारी विनीत कुमार आणि आरपीएफ कर्मचारी एस. एम. माने यांनी संबंधित महिलेला होत असलेल्या रक्तस्त्रावाची माहिती आदित्य बिर्लाच्या मोफत वैद्यकीय निगा केंद्रात फोन करून कळवली. त्यानंतर लागलीच रेल्वे कर्मचा-यांसोबत डॉक्टर माया रोकडे आणि परिचारिका सरिता माने यांनी फलाट गाठले. त्यांनी प्रसूती प्रक्रियेला तातडीने सुरुवात केली आणि सर्वसामान्य पद्धतीने प्रसूती पार पाडली.
        
मात्र सुरुवातीला बाळ रडले नसल्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यामुळे बाळाला संवेदना जाणवतील अशा पद्धतीने त्याला हाताळल्यावर ते लागलीच रडू लागले. त्यानंतर आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचा-यांनी लगेच माता-अर्भकाची स्थिती स्थिर केली आणि दोघांचे आरोग्य सामान्य असल्याची खातरजमा केली. बाळ-आईची योग्य ती तपासणी झाली. यावेळी बाळाचे वजन 3 किलो इतके भरले. नवजात शिशू (मुलगी)सोबत रुग्णाला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या डॉ. माया रोकडे यांनी दिली.

आमचे वैद्यकीय कर्मचारी अशा पद्धतीची आपतकालीन स्थिती हाताळण्यासाठी कायमच तत्पर असतात.रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे पोलिसांकडून आम्हाला मिळणारे सहकार्य अद्वितीय असते. माता आणि अर्भक सुखरूप असल्याचा मला आनंद आहे, अशा शब्दांत आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी आपली भावना व्यक्त केली.
 

Web Title: delivery on platform of Pune Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.