मागणी २०० लसींची, महपालिकेकडून दिल्या जातात ५०च लसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:51+5:302021-03-24T04:11:51+5:30
पुणे : पुणे महापालिकेकडे वारंवार मागणी करूनदेखील पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप खासगी रुग्णालयांनी केला ...
पुणे : पुणे महापालिकेकडे वारंवार मागणी करूनदेखील पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप खासगी रुग्णालयांनी केला आहे. दिवसभरात जवळपास २०० हून अधिक रुग्णांची नोंदणी झालेली असताना महापालिकेकडून फक्त ५० लसीच उपलब्ध करून दिल्या जात असल्याने लसीकरण नेमके करायचे कसे, असा प्रश्न या रुग्णालयांना पडला आहे.
पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण केले जावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये लसीकरण केंद्रदेखील वाढवत लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हे सगळं सुरू असताना लसीचा उपलब्धतेवरून सुरू असलेला गोंधळ अजूनही संपायला तयार नाही. गेल्याच आठवड्यात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचा उपलब्धतेवरून गोंधळ झाला होता. कोविशिल्डऐवजी कोव्हॅक्सिनचा लसी आल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण थांबले होते. त्यातच पहिल्या टप्प्यातील लसीकरण रद्द झाल्याचा मेसेज अनेक लोकांना गेला होता. त्यावरून अर्थातच नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. हा गोंधळ मिटेपर्यंतच आता पुन्हा एक नवा सुरू झालेला आहे.
महापालिकेकडून पुरेशा लसींचा पुरवठाच केला जात नसल्याची तक्रार अनेक खासगी रुग्णालयांनी केली आहे. संपूर्ण दिवसासाठी ५ व्हयल्स म्हणजेच फक्त ५० लसी पुरवल्या जात असल्याच खासगी रुग्णालयांचे म्हणणे आहे, अशी परिस्थिती असेल तर लसीकरण कसे करायचे असा सवाल रुग्णालय प्रशासनाचा वतीने महापालिकेला विचारला जात आहे.
याबाबत बोलताना एक डॉक्टर म्हणाले , ‘‘आम्ही दिवसाकाठी साधारण २०० लसीकरणाची सोय करतो. त्यातच जे ज्येष्ठ नागरिक थेट येऊन लसीकरण करून घेऊ इच्छितात त्यांनादेखील लसीकरण करण्यासाठी व्यवस्था करण्यात आाली आहे. पण महापालिकेने फक्त ५० लस उपलब्ध करून दिल्याने लसीकरण रद्द करायची तसेच नागरिकांना परत पाठवायची वेळ आमच्यावर आली. एकीकडे आजच सरकारने ४५ वर्षांवरील सगळ्यांचे सरसकट लसीकरण सुरू केले आहे. दुसरीकडे नोंद असलेल्या लोकांनादेखील पुरेशी लस उपलब्ध होत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आम्ही हे काम कसे करायचे ते आम्हाला कळत नाहीये. वाढती संख्या लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे याकडे खरंतर प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.’’
दरम्यान याबाबत विचारणा करण्यासाठी महापालिकेशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.