खरीप हंगामासाठी २८ हजार क्विंटल बियाणांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:12 AM2021-05-21T04:12:10+5:302021-05-21T04:12:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांत पावसाला सुरुवात होणार असल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांत पावसाला सुरुवात होणार असल्याने खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी तयारी केली आहे. या वर्षी खरिपासाठी प्रमुख बियाणांची २८ हजार ८६ क्विंटल इतकी मागणी करण्यात आली. त्यापैकी केवळ ८ हजार ३९३ बियाणांचा पुरवठा करण्यात आला. यंदा १ लाख ८४ हजार ४८० मेट्रिक टन एवढे खतांचे आवश्यकता असून त्यापैकी १ लाख २१ हजार ९६३ मेट्रिक खत उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख यांनी दिली.
खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतकरी पेरण्यांच्या तयारीला लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सर्व तालुक्यांची ऑलनाईल पद्धतीने खरीप आढावा बैठक पार पडली. या बैठकीत यंत्रणेला अनेक सूचना पदाधिकारी, सभापती तसेच अधिकाऱ्यांनी केल्या. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी भारत शेंडगे, जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख, कृषी विकास अधिकारी संजय पिंगट, मोहीम अधिकारी अशाक पवार आदी अधिकारी तसेच पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
पावसाचा अंदाज बघता ७ ते८ दिवसांत पेरण्यांना सुरुवात होणार आहे. यामुळे भाताचे बियाणे लवकरात लवकर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावे, अशी मागणी आंबेगावचे सभापती यांनी केली. तसेच विद्युत पुरवठ्याबाबत आवश्यक दुरुस्ती करणे आणि खतांची चढ्या भावाने विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांनी केली. बियाणे पुरवठ्याबाबत कृषी निविष्ठा संबंधित तालुकास्तरावर कक्ष स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच नेमून दिलेल्या कृषी सहायकांनी गावात हजर राहण्याच्या सूचना या वेळी करण्यात आल्या.
तळेगाव दाभाडे येथे खतासाठी रेक पॉईट करण्यात यावा तसेच नारायणगाव केव्हीकेमार्फत माती तपासणी करण्यास गती द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी केली. जीएसडीए करून १३८ गावांना सुरक्षित वर्गवारीच्या बाहेर टाकले असल्याने तेथे फेर सर्वेक्षण व्हावे. खतांबरोबर बियाणे यांचे लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा विविध सूचना या वेळी करण्यात आल्या.