भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ५० ऑक्सिजन बेडची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:10 AM2021-04-04T04:10:54+5:302021-04-04T04:10:54+5:30
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ट्रॉमा केअर सेंटरची इमारत बांधण्यात आली आहे. मात्र ट्रॉमा केअर सेंटर अद्याप सुरु न ...
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ट्रॉमा केअर सेंटरची इमारत बांधण्यात आली आहे. मात्र ट्रॉमा केअर सेंटर अद्याप सुरु न झाल्यामुळे गेल्या वर्षी या इमारतीमध्ये पन्नास बेडचे कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. तालुक्यातील कोविड सेंटर जवळपास भरली असून भिगवण येथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथील रुग्णांना उपचारासाठी बारामती, इंदापूर, अकलूज व इतरत्र लांबचा प्रवास करून जावे लागत आहे. रुग्णांना आर्थिक ताणांसह मोठा त्रासही सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, सरपंच तानाजी वायसे, पराग जाधव आदींनी येथील कोविड सेंटरमध्ये स्वच्छता राखण्यात यावी. येथे पन्नास ऑक्सिजन व्हेंटिलेटर युक्त बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, आदी मागण्या केल्या आहेत.
भिगवण ग्रामपंचायत व इंदापूर पंचायत समितीच्या मागणीनुसार इंदापूरचे निवासी तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी नुकतीच कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली आहे.
याबाबत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर होणार अपघात व या भागाची गरज विचारात घेऊन आपण भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटरला मंजूर केले होते. सध्या ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू आहे. या ठिकाणी पन्नास ऑक्सिजन बेडची उपलब्धता करून द्यावी यासाठी पाठपुरावा करत आहे.
फोटो ओळ : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील ट्रोमा केअर सेंटर.