डीजेविरोधात कारवाईची मागणी
By admin | Published: May 15, 2014 05:28 AM2014-05-15T05:28:35+5:302014-05-15T05:28:35+5:30
वैशाख महिना म्हणजे लग्नसराईचे दिवस, विवाहांची रेलचेल.
नसरापूर : वैशाख महिना म्हणजे लग्नसराईचे दिवस, विवाहांची रेलचेल. या मंगल सोहळ्यातून वाजंत्रीसह पहाडी आवाजाचे डिजे हेही समीकरण ठरलेलेच असते. मात्र, या आवाजामुळे सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पर्यावरण संरक्षण कायद्याखाली या पहाडी आवाजाच्या डिजेविरूद्ध पोलिसांनी वेळीच कारवाई केली पाहिजे असे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे . डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे समाजमनावर काय विपरीत परिणाम होतो याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पारंपरिक मंगलवाद्यांना दूर सारल्याचे चित्र दिसू लागले आहे. कर्णकर्कश आवाजाच्या विरोधात शासनाने पाऊल उचलले आहे. मात्र, याविरोधात गुन्ह्यांची नोंद मात्र नगण्य आहे. भोर तालुक्यात डीजेचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. मात्र नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात फक्त एका डीजे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून याकडे पोलिसांनी कानाडोळा केला आहे. वास्तविक या डिजेच्या पहाडी आवाजामुळे छातीचे ठोके चुकतात. या डिजेच्या आवाजामुळे घराघरातील भांडी फळीवरून खाली पडतात तर खिडक्यांच्या काचा थरथरतात. एवढा प्रचंड आवाज होऊनही पोलीस मात्र बघ्याचीच भूमिका घेत आहेत. आवाजाविरोधात पोलीसांकडे तक्रार केल्यास तात्प्ुारती कारवाई करून वेळ मारून नेतात असे बोलले जाते. या पर्यावरणभेदी प्रकाराविरोधात संबंधित पोलिस खात्याने योग्य पवित्रा घेवून जनसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे. (वार्ताहर)