दोषींवर कारवाईची मागणी
By admin | Published: May 26, 2017 06:18 AM2017-05-26T06:18:00+5:302017-05-26T06:18:00+5:30
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पेपरफुटीप्रकरणी विविध विद्यार्थी संघटनांनी गुरुवारी दोषींवर कारवाई करण्याची मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पेपरफुटीप्रकरणी विविध विद्यार्थी संघटनांनी गुरुवारी दोषींवर कारवाई करण्याची मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) परीक्षा विभागाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून विद्यापीठात आंदोलन केले.
अभियांत्रिकीच्या काही विषयांच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका तासभर आधी विद्यार्थ्यांना मोबाईलवर मिळाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरूड व वाघोली पोलीस ठाण्यांत संबंधित विद्यार्थ्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला. या पेपरफुटी प्रकरणाच्या निषेध करण्यासाठी ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी परीक्षा नियंत्रक कार्यालय ते कुलगुरू कार्यालयापर्यंत परीक्षा विभागाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून आंदोलन केले.
भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन दोषांवर कारवाईची मागणी केली. योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. या वेळी सेनेचे शहर संघटक अतुल दिघे, शिवाजीनगर विभाग संघटक किरण पाटील, उपसंघटक प्रसाद बागाव, हृषीकेश जाधव, प्रथमेश पवार आदी उपस्थित होते.