टेरेस हॉटेलवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 03:29 AM2018-09-17T03:29:06+5:302018-09-17T03:29:21+5:30
साईड मार्जिनमध्ये तब्बल ८२ हॉटेलचालकांनी अनाधिकृत बांधकाम केल्याची माहिती पालिकेच्यावतीने मुख्य सभेत कळवण्यात आली.
पाषाण : बाणेर परिसरात टेरेसवर हॉटेलला परवानगी नसताना सर्रास पत्र्याचे शेड टाकून हॉटेल बांधण्यात आली आहेत, तर साईड मार्जिनमध्ये तब्बल ८२ हॉटेलचालकांनी अनाधिकृत बांधकाम केल्याची माहिती पालिकेच्यावतीने मुख्य सभेत कळवण्यात आली.
बाणेर बालेवाडी परिसरात हॉटेल व बार रेस्टॉरंटचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. काही वर्षांत शेकडो हॉटेल या परिसरात तयार झाली आहे. परंतु पालिकेचे नियम धाब्यावर बसवून हॉटेल उभारण्यात आल्याने या परिसरातील सार्वजनिक व्यवस्था वरील ताण वाढला आहे.
आॅगस्ट महिन्यात पालिकेच्या मुख्य सभेत या अनधिकृत हॉटेलविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावेळी पालिकेच्या माहितीमध्ये असलेली नऊ टेरेसवर सुरू असलेली हॉटेल व ८२ साईड मार्जिनमध्ये बांधकाम केलेली हॉटेलची माहिती मुख्य सभेत मांडण्यात आली आहे. टेरेसवर हॉटेलला परवानगी अनुज्ञेय नाही असे असतानाही सर्रास अशी हॉटेल चालू का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनधिकृत बांधकाम केलेल्या हॉटेलची संख्या शेकडोच्यावर असताना पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याचा आक्षेप बाणेर बालेवाडी परिसरातील लोकप्रतिनिधी यांनी घेतला आहे.
यामुळे स्मार्ट सिटीच्या स्मार्ट एरियात अ हॉटेलच्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेची कारवाई योग्यरीतीने होत नसल्यामुळे अनधिकृत हॉटेल बांधली जात आहेत. ही हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने कायद्याचा प्रश्न निर्माण होतो. अनधिकृत हॉटेलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक व लोकप्रतिनिधी करत आहेत.
अनाधिकृत हॉटेलमुळे बाणेर परिसरात पार्किंग समस्या, तसेच साऊंड सिस्टीममुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. या हॉटेलवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
- स्वप्नाली सायकर,
नगरसेविका
अनधिकृत हॉटेलवर कलम ५२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अनधिकृत दारू विक्री करणारे हॉटेल यांच्यावर कोणतेही निर्बंध राहिले नाहीत. टेरेसवर हॉटेलल परवानगी नसताना हॉटेल सुरू आहेत, यावर कारवाई झाली पाहिजे.
- ज्योती कळमकर,
नगरसेविका