दाभोलकर यांच्या खुनातील सूत्रधारांना पकडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:14 AM2021-08-22T04:14:40+5:302021-08-22T04:14:40+5:30
डॉ. दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने वीरेंद्र तावडे व त्यानंतर शरद कळसकर, सचिन अंदुरे व संजीव पुनाळेकर, ...
डॉ. दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने वीरेंद्र तावडे व त्यानंतर शरद कळसकर, सचिन अंदुरे व संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, इतर आरोपींवरुद्ध अद्याप आरोपपत्र दाखल केले नाही. डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश या चारही खुनांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले असून, या गुन्ह्यांमधील काही संशयित आरोपी समान आहेत. तसेच दोन समान शस्त्रे या चार खुनांमध्ये वापरली आहेत. या चारही खुनांमध्ये शेवटची अटक जानेवारी २०२० मध्ये झालेली आहे. कर्नाटक एसआयटीने झारखंड राज्यातून गौरी लंकेश यांच्या खुनात संशयित आरोपी म्हणून ॠषिकेश देवडीकरला अटक केली होती.
या खुनांमागील आरोपी पकडले न गेल्याने देशातील विवेक विचावंत कायकर्ते व पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका टळलेला नाही. त्यामुळे या खुनांचा तपास करून दोषी आरोपींना तत्काळ शिक्षा करावी, अशी मागणी अनिंसचे राज्य कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, नंदिनी जादव, श्रीपाल ललवानी, पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनिल वेल्हाळ अनिकेत तिकोनकर, वसंत कदम यांनी केली आहे.