पबजी गेममुळे मुलांच्या मनावर होताहेत परिणाम, बंदी घालण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 01:16 AM2019-02-09T01:16:52+5:302019-02-09T01:18:30+5:30

मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आजकाल मोबाईलवरील गेमचे वेड लागलेले पाह्यला मिळते. सध्या अनेकजण पबजी या गेममध्ये व्यस्त दिसत आहेत. या गेमला लोक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत.

demand to ban on PUBG Game | पबजी गेममुळे मुलांच्या मनावर होताहेत परिणाम, बंदी घालण्याची मागणी

पबजी गेममुळे मुलांच्या मनावर होताहेत परिणाम, बंदी घालण्याची मागणी

googlenewsNext

पिंपरी - मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आजकाल मोबाईलवरील गेमचे वेड लागलेले पाह्यला मिळते. सध्या अनेकजण पबजी या गेममध्ये व्यस्त दिसत आहेत. या गेमला लोक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. पोकेमॉन गो, ब्लू व्हेल यांसारख्या गेमनी काही दिवसांपूर्वी मुलांवर गारूड घातले होते. त्यात पबजीची भर पडली आहे. अनेक पालकांनी या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली असून, मानसोपचार तज्ज्ञांच्या मते हा गेम जिवाला घातक आहे.

पोकोमॉन, ल्युडो किंग व ब्लू व्हेल या गेमनंतर पबजी हा गेम इंटरनेटवरील सध्याचा बेस्ट अ‍ॅक्शन गेम आहे. हा गेम मोबाइल, टॅब, लॅपटॉपवर खेळता येतो. दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम कंपनीने ब्लू होल सहायक अंतर्गत हा गेम बनवला आहे. या गेममध्ये कमीत कमी १ ते ४ सदस्य सहभागी होऊ शकतात. त्यांच्या बरोबरीने हा गेम समूहाने खेळला जातो. या गेममध्ये गेम खेळणारा सैनिकाची भूमिका बजावत, वेगवेगळ्या क्षेत्रांत घुसून विरोधी पक्षाला बंदुकीने मारायचे काम करतो. त्यांचे साहित्य हस्तगत करतो. या गेममध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून गेम खेळणारे खेळाडू एकमेकांशी लाइव्ह संवाद साधतात आणि एकमेकांना मार्गदर्शन करतात. या गेमवर आकर्षक बक्षिसे असल्यामुळे या गेमकडे लोकांचे आकर्षण वाढत आहे.

या गेममध्ये आकर्षक व्हिज्युअल्स आणि अ‍ॅक्शनचा समावेश केला आहे. त्यामुळे या गेमकडे तरुणाई आकर्षित होत आहे. गेम खेळण्याबरोबरच त्यात चॅटिंगही करता येते. मुळात हा गेम १८ वर्षांवरील मुलांसाठीच आहे. परंतु, त्यापेक्षा कमी वयाची मुलेही हा गेम जास्त खेळत असल्याचे दिसून येत आहे. या हिंसक खेळांमुळे मुलांमध्ये आक्रमक स्वभाव वाढत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावर अंकुश लावण्याची मागणी होत आहे.

मोबाइलवर एकाग्र चित्ताने खेळला जाणारा खेळ मुलांना अभ्यासापासून, कुटुंबापासून व एकूणच दैनंदिन कार्यातून वेगळे करतो. सतत गेम खेळल्याने डोळ्यांचे आजार होत आहेत. गेममधून हिंसक प्रवृत्ती मनावर लादल्याने मुले हिंसक होतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही ते हिंसक वृत्ती दाखवतात. घरामध्ये आई-बाबांसोबत चिडून बोलणे, भावंडांसोबत मारामारी करणे, वडीलधाऱ्या माणसांना उद्धट बोलणे असे प्रकार यामुळे वाढतात. अशा वेळी या गेमच्या आहारी गेलेल्या मुलांना अभ्यास व दैनंदिन उपक्रमात मन रमविण्यात अडचणी येतात. एकूणच मुलांची शिक्षणातील बौद्धिक पातळी खालावते. - डॉ. स्मिता कुलकर्णी, समुपदेशक

लहान मुलांवर तसेच तरुणांवर होणारे परिणाम
१. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतो. एकमेकांना शिव्या देण्याचे प्रमाण वाढते.
२. गेम खेळण्यासाठी रात्रीच्या वेळी जागरण केले जाते, तसेच जास्त वेळ मोबाइल डोळ्यासमोर धरला जातो. त्यामुळे साहजिकच आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
३. गेममध्ये लक्ष केंद्रित केल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. गेममधील आक्रमकपणा सतत अनुभवल्यामुळे आक्रमक स्वभावाला खतपाणी मिळते.
४. सायबर क्राइम होण्याची दाट शक्यता आणि बेशिस्तपणादेखील वाढतो.
यांसारखे अनेक परिणाम मुलांवर होत आहेत.

Web Title: demand to ban on PUBG Game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.