आणखी पाणीकपात आता बास, सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 01:55 AM2018-12-17T01:55:29+5:302018-12-17T01:56:00+5:30

सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी : अनेक भागांत टॅँकरने पाणीपुरवठा

The demand for bass, all-party corporators is now more in watercourse | आणखी पाणीकपात आता बास, सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

आणखी पाणीकपात आता बास, सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

Next

पुणे : शहरातील अनेक भागांत आत्ताच कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. काही भागात तर टँकरशिवाय पर्याय नाही. पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आणखी पाणीकपात झाल्यास तीव्र टंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे आणखी कपात नकोच, अशी अपेक्षा सत्ताधारी भाजपासह इतर पक्षांतील अनेक नगरसेवकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. सध्या शहराला मिळणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर कपात होण्याची चिन्ह आहेत.

या पार्श्वभूमीवर या नगरसेवकांच्या प्रभागातील पाणीटंचाईच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला. भाजपाच्या काही नगरसेवकांनी मात्र सावध भूमिका घेत पाणीकपात होणार नसल्याचे सांगितले, तर काही नगरसेवकांनी पाण्याची बचत करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. अनेकांनी प्रभागात आताच पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर भेडसावत असल्याबद्दल नाराजी
व्यक्त केली.

आतापर्यंत हिवाळ्यात पाणीकपातीचा सामना पुणेकरांना कधीच करावा लागला नाही. शहरात राष्ट्रवादीचा महापौर असताना पाणीकपातीची समस्या कधीही उद्भवली नाही. अजित पवार पालकमंत्री असताना पुणे शहराला कधीही पाण्याची कमतरता भासू दिली नाही. प्रभागातील नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
- बाबूराव चांदेरे, बाणेर, बालेवाडी पाषाण
धरणातील उपलब्ध पाण्याचा साठा कमी असल्याने पाण्याची बचत करणे काळाची गरज आहे. नियोजनातून मार्ग काढण्यासाठी आम्ही तत्पर राहणार आहोत.
- दिलीप वेडेपाटील, बावधन खु. - कोथरुड डेपो
शहरातील पाणीगळती थांबवण्यासाठी महानगरपालिकेने उपाययोजना केल्यास पाणीकपातीच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. सद्य:स्थितीत नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
- मंजूश्री खर्डेकर,
एरंडवणा-हॅपी कॉलनी
प्रभागामध्ये पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाºया नागरिकांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यांना लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणार आहे.
- स्वाती लोखंडे,
डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी
पुणेकरांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार
आहे. १३५० एमएलडी पाण्यात कुठल्याही
प्रकारची कपात होणार नाही. पुणेकरांना
कुठल्याही प्रकारच्या पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही.
- सिद्धार्थ शिरोळे,
डेक्कन जिमखाना - मॉडेल कॉलनी
पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. पण त्या तुलनेत सध्या परिस्थिती बºयापैकी स्थिर आहे.
- सुनीता गलांडे,
वडगाव शेरी-कल्याणीनगर

पाणीकपात आहेच. प्रभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना पाणी कमी वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. आयुक्तांबरोबर चर्चादेखील केली. पाणी वेळेवर मिळावे, अशी सूचना केली आहे.
- गणेश बिडकर, सोमवार पेठ
कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. उपाययोजनांची गरज आहे. पाणी नियोजनासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे.
- गोपाळ चिंतल, संगम पार्क
पहिल्यापासूनच पाण्याचा कमी पुरवठा होत आहे. नागरिकांनी पाणी कमी वापरावे. पाणीप्रश्नावर अनेकदा चर्चा केली आहे.
- श्रीकांत जगताप, वडगाव बु., हिंगणे खुर्द

पाणी मिळण्याविषयी बºयाच अडचणी आहेत. पाण्याचा दबावदेखील कमी आहे. नागरिकांनी अडचण समजून घ्यावी. मुळातच पाण्याची कमतरता आहे.
- रंजना टिळेकर,
कोंढवा बु. - येवलेवाडी
सध्या दिवसाआड पाणी येत आहे. उपाययोजना म्हणून नवीन पाईपलाईन टाकणार आहोत. तसेच टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
- किरण जठार, कळस-धानोरी
सध्या दोन दिवसाआड पाणी येत आहे. प्रभागात पाणी समस्या गंभीर आहे. अधिकाºयांशी सतत चर्चा करीत आहोत.
- राहुल भांडारे, विमाननगर-सोमनाथनगर

पाणीकपात होणार नाही, याची चर्चा वरिष्ठ पातळीवर चालू आहे. पुणेकरांना कुठल्याही प्रकारच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. लवकरात लवकर उपाययोजना अंमलात आणल्या जातील.
- मुरलीधर मोहोळ, मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी
आतापर्यंत पाणीपुरवठा व्यवस्थित आहे; पाणीकपात होत असेल तर टँकरसारख्या पर्यायी उपाययोजना कराव्या लागतील.
- श्वेता खोसे,
विमाननगर - सोमनाथनगर
पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. याआधी आयुक्तांशी अनेकदा चर्चा केली. सध्या अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
- सुनील टिंगरे, फुलेनगर-नागपूर चाळ

पाण्याचा दाब पहिल्यापासूनच कमी आहे. पाणी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. लोक प्रबोधनातून पाणीवापराचे संदेश देत असतो. अधिकाºयांबरोबर चर्चा झाली आहे.
- रघुनाथ गौडा
पाणी नियोजन हवेच. नियोजनशून्य कारभारामुळे पुणेकरांची फसवणूक केली. मतदारांच्या विश्वासाला तडा दिला. घोर पाणीटंचाई प्रभागात जाणवत आहे. प्रशासनाच्या वचक राहिलेला नाही.
- सुभाष जगताप, सहकारनगर-पद्मावती
पाण्याविषयी तीव्र अडचणी जाणवत आहेत. पाण्यासाठी प्रभागात बोंबाबोंब होत आहे. आतापासूनच टँकरची व्यवस्था केली जात आहे. अधिकाºयांशी सातत्याने चर्चा सुरू आहे.
- सुनीता वाडेकर, औंध-बोपोडी
मुळात आमचा प्रभाग उंचावर असल्याने आधीच पाणीपुरवठा कमी असतो. आताच टंचाई भासत असल्यामुळे जर पाणीकपात झाली तर अजूनच अडचण येईल.
- मारुती सांगडे, कळस-धानोरी
आमच्या प्रभागात दिवसाआड पाणी येते. पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. याआधी पालिकेत तक्रारदेखील केली होती. परंतु यावर कोणतेही दखल घेतलेली नाही. पण कपातीच्या काळात टँकरने पाणीपुरवठा करणार आहे.
- रेखा टिंगरे, कळस-धानोरी
पहिल्यापासून पाणीपुरवठा व्यवस्थित नाही. याबाबत अनेकदा तक्रार केली होती. पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरने पाणीपुरवठा करणार आहे.
- फरजाना शेख, फुलेनगर - नागपूर चाळ
 

Web Title: The demand for bass, all-party corporators is now more in watercourse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे