भोरला टँकरची मागणी वाढली
By admin | Published: March 25, 2017 03:41 AM2017-03-25T03:41:10+5:302017-03-25T03:41:10+5:30
तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. ४ गावे व ४ वाड्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर केले
भोर : तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. ४ गावे व ४ वाड्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर केले आहेत. भविष्यात त्यात वाढ होणार आहे. त्यामुळे सदर गावांना लवकरात लवकर टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.
गेल्या वर्षी टंचाईग्रस्त ४ गावे आणि १६ वाड्यावस्त्यांना ६ खासगी टँकरने २७ एप्रिलपासून पाणी सुरू करण्यात आले होते. ते ३० जूनला बंद करण्यात आले. दोन महिने टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.
या वर्षी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने टंचाई लवकर जाणवू लागली आहे. पंचायत समितीकडे भाटघर धरणभागातील भुतोंडे, डेरे, खिळदेववाडी, गृहिणी, धनगरवस्ती, खुलशी तर नीरा-देवघर धरण भागातील शिरवली हि.मा., म्हसर बुद्रुकची धनगरवस्ती या चार गावांनी व ४ वाड्यावस्त्यांनी टँकरचा प्रस्ताव दिला आहे.
पंचायत समितीकडून तो तहसीलदारांकडे पाठवून प्रातांधिकाऱ्यांमार्फत मंजूर होईल.
या गावातील टंचाईची उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करूनच हे प्रस्ताव मंजूर करून त्यानंतर टँकर सुरू करण्याची पद्धत आहे. मात्र, या सर्व प्रक्रिया पूर्ण कधी होणार? टँकर कधी सुरू होणार? त्याला वेळ लागणार असल्याने टंचाई वाढतच जाणार आहे. आणखी गावे टँकरची मागणी करीत राहणार. त्यामुळे लवकरात लवकर टँकर सुरू करावेत, अशी मागणी या ग्रमास्थांनी केली आहे. (वार्ताहर)