जाहिरात फलक लावण्याकरिता 'ना हरकत' प्रमाणपत्रासाठी मागितली ३ लाख ६० हजारांची लाच; पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 05:59 PM2021-05-12T17:59:23+5:302021-05-12T18:04:08+5:30
कारवाई करण्यात आलेले अधिकारी येरवडा वाहतूक विभागात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे.
पुणे : जाहिरात फलक लावण्याकरीता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ३ लाख ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरुन येरवडा वाहतूक विभागातील एका पोलीस उपनिरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
बसवराज धोंडोपा चित्ते असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. चित्ते हे येरवडा वाहतूक विभागात उपनिरीक्षक म्हणून नेमणूकीला आहे. तक्रारदार यांना जाहिरात फलक लावण्यासाठी वाहतूक विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी पोलिसांकडे अर्ज केला होता. ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे ३ लाख ६० रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने याची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची १६ एप्रिल, २० एप्रिल व ३ मे रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात चित्ते यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मात्र, प्रत्यक्ष सापळा कारवाई होऊ शकली नाही, तरीही लाच मागितल्याचे निष्पन्न झाले असल्याने शेवटी लाच लुचप्रतिबंधक विभागाकडून लाच मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर अधिक तपास करीत आहेत.