फसवणूकप्रकरणी अटकेची मागणी

By admin | Published: May 8, 2017 02:40 AM2017-05-08T02:40:59+5:302017-05-08T02:40:59+5:30

चिटफंडच्या नावाखाली लोणावळा व कामशेत परिसरातील महिला व नागरिकांना कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करायला

Demand in the case of cheating | फसवणूकप्रकरणी अटकेची मागणी

फसवणूकप्रकरणी अटकेची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : चिटफंडच्या नावाखाली लोणावळा व कामशेत परिसरातील महिला व नागरिकांना कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करायला लावत अचानक पैसा घेऊन पोबारा केलेल्या नांगरगाव (लोणावळा) येथील दाम्पत्याविरोधात लोणावळा शहर व कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन सहा महिने झाले. मात्र, अद्याप आरोपींना अटक केले जात नसल्याने फसवणूक झालेल्या जवळपास १०७ महिलांनी पोलिसांच्या विरोधात वडगाव मावळ येथे तहसीलदार कार्यालयासमोर १८ मेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला
आहे.
नांगरगाव येथे राहणारे राजेश दत्तात्रय गायकवाड व सुनीता राजेश गायकवाड यांनी लोणावळा व परिसरात राहणाऱ्या महिलांना आपण पिंपरी चिंचवड येथे चिटफंड चालवत असून त्यामधून मोठ्या प्रमाणात नफा मिळत आहे, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. काही पैसे जमिनींमध्ये गुंतवणूक करून तुम्ही गुंतवलेल्या रक्कमेचा दुप्पट परतावा तुम्हाला स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मार्फत मिळेल, असे सांगत सन २०१४ पासून परिसरातील नागरिकांकडून चिटफंडमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीचे काही दिवस नागरिकांना गुंतवणुकीचा परतावा योग्य प्रमाणात मिळू लागल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली व एक दिवस जे व्हायचे ते झाले. गायकवाड पती-पत्नीने सर्व गुंतवणुकदारांचे पैसे घेऊन लोणावळ्यातून पोबारा केला.

फसवणुकीचा गुन्हा
याप्रकरणी लोणावळ्यातील लक्ष्मीबाई महादू घारे व इतर १२ जणांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गायकवाड पतीपत्नी विरोधात फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे. कामशेत पोलीस ठाण्यातही याप्रकरणी
गुन्हा दाखल आहे. १०७ महिला व पुरुष यांची या प्रकरणात १५ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाली आहे.
दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन जवळपास सहा महिने झाले तरी अद्याप आरोपी अटक झालेले नाहीत. पुणे ग्रामीण अधीक्षक व कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊनही तपासाला गती मिळत नसल्याने न्यायासाठी आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग निवडला असल्याचे या महिलांनी सांगितले. जवळचे सर्वच पैसे या चिटफंडामध्ये गुंतविल्याने काही घरांत खाण्याची भ्रांत झाली आहे.

Web Title: Demand in the case of cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.