पूजा चव्हाण मृत्यू तपास सीबीआयकडे देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:21 AM2021-03-13T04:21:52+5:302021-03-13T04:21:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूजा चव्हाणला न्याय मिळावा यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) किंवा विशेष तपास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूजा चव्हाणला न्याय मिळावा यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) तपास सोपवण्याची जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आल्याचे भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितले.
वाघ म्हणाल्या की, पूजा चव्हाण प्रकरण तडीस नेणार आहे. या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. अशा परिस्थितीत राज्याचे गृहमंत्री गुन्ह्यांचा आलेख तपासत बसले आहेत. लातूर जिल्ह्यात एक तरुणी तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपानुसार नोकरीची मागणी करीत आहे. तर तेथील समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यावर नोकरी का देत नाही अशी तक्रार केली असता उलट तिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला, असे वाघ म्हणाल्या. त्या शुक्रवारी (दि. १२) पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
“येथे कुंपणच शेत खात आहे. तर न्याय कोणाकडे मागावा. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेवर औरंगाबाद येथे बलात्काराचा प्रयत्न झाला. कोविडसाठी दाखल झालेल्या महिलांच्या सुरक्षेसाठी एसओपी (स्टँडर्ड ऑप्रेटिंग प्रोसिजर) असावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.