राष्ट्रीयीकृत बँक उभारण्याची मागणी
By Admin | Published: November 15, 2016 03:10 AM2016-11-15T03:10:10+5:302016-11-15T03:10:10+5:30
वेगाने विकसित होत असलेल्या मोशी भागात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा नसल्याने त्या बँका मोठ्या गुंतवणूकदारांना मुकत असून, त्याचा लाभ सहकारी बँका
मोशी : वेगाने विकसित होत असलेल्या मोशी भागात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा नसल्याने त्या बँका मोठ्या गुंतवणूकदारांना मुकत असून, त्याचा लाभ सहकारी बँका व पतसंस्थांना होताना दिसून येत आहे. येथे राष्ट्रीयीकृत बँक उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सहकारी बँकेत नोटा उपलब्ध करून देण्याचा निर्णय उशिराने घेतला गेल्याने तोपर्यंत येथील नागरिकांना नोटा बदलण्यासाठी भोसरी, चाकण, आळंदी येथील बँकांमध्ये रांग लावावी लागली. पतसंस्थेच्या कर्जवाटपावर सरकारचे थेट निर्बंध नसल्याने यात सामान्य गुंतवणूकदाराला आपला पैसा बुडतो की काय याची धास्ती लागून असते. इच्छा असूनही त्याला राष्ट्रीयीकृत बँकेत पैसे गुंतविण्याचा पर्याय मोशी भागात उपलब्ध नाही. यामुळेच मोशी परिसरात केवळ बँकांचे एटीएम न देता राष्ट्रीयीकृत बँकांनी शाखा उभाराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
येथे भाविक व पर्यटकांची मोठी वर्दळ असते. येथे उतरल्यानंतर त्यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी भोसरी, चाकणच्या बँकेपर्यंत पायपीट करावी लागते. तीस ते ४० हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या मोशी-डुडुळगाव भागात एकही राष्ट्रीयीकृत बँक नाही. यामुळे आतापर्यंत केवळ सहकारी
बँक व खासगी पतसंस्थावरच या भागातील नागरिकांची भिस्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे या परिसरात राष्ट्रीयीकृत बँकेची आवश्यकता भासत आहे. (वार्ताहर)