डीएसकेंच्या घराबाहेर कर्मचा-यांचे ठिय्या आंदोलन, सहा महिन्यांपासूनचा थकीत पगार देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:41 AM2017-09-08T02:41:13+5:302017-09-08T02:42:07+5:30
डीएसके यांच्या परिवारातले सदस्य म्हणून आजवर त्यांना खूप साथ दिली... मात्र आता पैशाअभावी आमचे कुटुंब रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
पुणे : डीएसके यांच्या परिवारातले सदस्य म्हणून आजवर त्यांना खूप साथ दिली... मात्र आता पैशाअभावी आमचे कुटुंब रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. डिसेंबरपासून वाढीव भत्ता दिलेला नाही, पीएफची रक्कमही जमा केलेली नाही आणि एप्रिलपासून पगारही दिलेला नाही, पैशाविना मुलांच्या शाळेचे शुल्क भरू शकलो नाही, विजेचे बिल भरता आलेले नाही, महाविद्यालयाचे शिक्षणही पूर्ण करू शकत नाही... अशा अनेक व्यथा डीएसके टोयोटा ग्रुपमधील कर्मचारी मांडत होते.
कोल्हापूर, सांगली, नगर, सातारा आदी राज्यभरातील जवळपास ३०० कर्मचाºयांनी चतु:शृंगी येथील डी. एस. कुलकर्णी यांच्या बंगल्याबाहेर गुरुवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत रक्कम दिली जात नाही तोवर बंगल्यासमोरून हटणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ज्येष्ठ उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर गुंतवणूकदारांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कर्मचाºयांनीही ६ महिन्यांपासून थकलेल्या पगाराचा तगादा लावल्याने डीएसके पुन्हा अडचणीत सापडले आहेत. डीएसके यांनी आम्हाला खूप साथ दिली आहे. त्यांच्या अडचणीत आम्हीही त्यांना गेल्या ६ महिन्यांपासून सहकार्य करीत आहोत. मात्र, आता पाणी डोक्यावरून वाहून गेले आहे. शेवटी आम्हालाही आमचे कुटुंब आहे. त्यांना सातत्याने पगाराची रक्कम देण्यासंदर्भात आम्ही मेल केले आहेत. यावर अमुक एका तारखेला रक्कम दिली जाईल, असे केवळ आश्वासनच आम्हाला देण्यात आले. दि. ६ सप्टेंबरला रक्कम दिली जाईल, असा मेल त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनी केला होता; मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नाही.
आम्हाला आमचे पैसे दिले नाहीत तर पुण्यात येऊन घरासमोर आंदोलन करू, असा मेल आम्ही त्यांना केला होता. मात्र, त्यावरही काही उत्तर आले नाही. शेवटी आम्ही हा आंदोलनाचा निर्णय घेतला.
सकाळी १० पासून आम्ही त्यांच्या घराबाहेर बसून आहोत; मात्र आमची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे मिळत नाहीत आम्ही इथून जाणार नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले.