डीएसके यांचा धडा वगळण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 09:29 PM2018-07-04T21:29:36+5:302018-07-04T21:30:57+5:30
डीएसके यांना अार्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक झाल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमातील डीएसके यांचा धडा वगळण्याची मागणी करण्यात येत अाहे.
पुणे : घराला घरपण देणारी माणसं या टॅगलाईन खाली जाहीरात करणाऱ्या डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्याच घराला घरपण राहिलं नाही. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या अाराेपाखाली डीएसके तुरुंगात अाहेत. डीएसकेंचा व्यवसाय, त्यांचे कार्य लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाच्या अभ्यासक्रमाच्या यशाेगाथा या पुस्तकात 'वास्तू उद्योगाचे अग्रणी डी. एस. कुलकर्णी' अशा मथळ्याखाली एक धडा 2013 साली समाविष्ट करण्यात अाला हाेता. डीएसकेंना अार्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक झाल्याने अाता हा धडा पुस्तकातून वगळण्याची मागणी करण्यात येत अाहे.
डीएसके यांच्यावर विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या यशाेगाथा या अभ्यासमंडळ मान्यताप्राप्त पुस्तकात 'वास्तू उद्योगाचे अग्रणी डी. एस. कुलकर्णी' अशा मथळ्याखाली एक धडा आहे. हे पुस्तक 15 जून 2013 राेजी छापण्यात अालं हाेतं. दरम्यान गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके व त्यांच्या पत्नीला अार्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात अाली अाहे. त्यामुळे विद्यापीठाने हा धडा अाता वगळावा अशी मागणी करण्यात येत अाहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अामदार हेमंत टकले हाच मुद्दा गुरुवारी अधिवेशनात उपस्थित करणार अाहेत. त्याचबराेबर संभाजी ब्रिगेडकडून विद्यापीठाला निवेदन देण्यात अाले असून हा धडा वगळण्याची मागणी केली अाहे. तसेच मागणी मान्य न केल्यास विद्यापीठासमाेर पुस्तकाची हाेळी करण्यात येईल, तसेच संभाजी ब्रिगेड अांदाेलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे यांनी दिला अाहे.
याविषयी बाेलताना टकले म्हणाले, 2013 साली डीएसके यांची यशाेगाथा सांगणारा धडा वाणिज्य विभागाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात अाला हाेता. इतक्या वर्षानंतर अभ्यासमंडळाने अभ्यासक्रमाचा अाढाव घेणे अावश्यक हाेते. शिक्षकांनी हा धडा शिकवताना डिएसके हे उद्याेगपती म्हणून शिकवायचं की घाेटाळ्यातील अाराेपी म्हणून असा प्रश्न निर्माण झाला अाहे. त्यामुळे या धड्याचा फेरविचार व्हावा असा अाैचित्याचा मुद्दा गुरुवारी अधिवेशनात उपस्थित करणार अाहे.