प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:08 AM2021-06-23T04:08:34+5:302021-06-23T04:08:34+5:30
पुणे : राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या २०२० पर्यंत रिक्त झालेल्या जागांचा आढावा घेऊन प्राध्यापकांची सर्व पदे तत्काळ भरावीत. तसेच तासिका ...
पुणे : राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या २०२० पर्यंत रिक्त झालेल्या जागांचा आढावा घेऊन प्राध्यापकांची सर्व पदे तत्काळ भरावीत. तसेच तासिका तत्त्वावरील धोरण पूर्ण रद्द करून प्राध्यापकांना समान काम- समान वेतन द्यावे, असे निवेदन युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्यासह नेट सेट पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांना दिले.
राज्यात सुमारे दहा ते बारा वर्षांपासून प्राध्यापक भरती नियमितपणे करण्यात आली नाही. परिणामी, प्राध्यापकांची हजारो पदे रिक्त आहेत. त्यामुळे नेट-सेट पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्या वतीने सोमवारपासून विविध मागण्यांसाठी उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सोमवारी आंदोलनास पाठिंबा दिला. त्यानंतर मंगळवारी युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. उच्च शिक्षण संचालकांशी प्राध्यापकांच्या भरतीबाबत चर्चा केली. तसेच २०१७ पर्यंत रिक्त असलेल्या पदान ऐवजी २०२० पर्यंत रिक्त झालेल्या एकूण पदांचा आढावा घेऊन त्यानंतर प्राध्यापक भरती सुरू करावी, अशी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची मागणी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासमोर मांडणार असल्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.
दरम्यान, राज्य शासनाकडून प्राध्यापक भरतीबाबत अध्यादेश प्रसिद्ध केला जात नाही, तोपर्यंत संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये काही विषयांसाठी एकही शिक्षक उपलब्ध नाही. परिणामी, महाविद्यालय चालविणे अवघड जात आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. त्यामुळे शासनाने प्राध्यापक भरतीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांकडून व्यक्त केली जात आहे.