पठारवाडी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:09 AM2021-07-25T04:09:15+5:302021-07-25T04:09:15+5:30
चाकण पालिका हद्दीतील पठारवाडी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने रस्ता डांबरीकरणाला मंजुरी मिळून, निधी ...
चाकण पालिका हद्दीतील पठारवाडी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने रस्ता डांबरीकरणाला मंजुरी मिळून, निधी उपलब्ध होताच डांबरीकरणाचे काम चालूही झाले. रस्त्याचे काम अर्ध्यावर येताच पाऊस सुरू झाल्याने हे काम सध्या बंद ठेवण्यात आले आहे. परंतु मागील काही वर्षे पावसाळ्यात चिखल, खड्ड्यांचा सामना पठारवाडीच्या नागरिकांना करावा लागत होता. तीच समस्या सुरू असलेल्या पावसाळ्यात नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.
रस्त्यांवरील खड्डे हे खोलगट झाल्याने त्यात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अंदाज लावणे कठीण जात आहे. यामुळे अपघात घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुरुम टाकून खड्डे तरी बुजवावे, अशी मागणी पठारवाडीतील नागरिक करत आहेत.
पावसाळ्यात डांबरीकरण करता येत नसल्याने काम बंद ठेवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत तेथील खड्डे पावसाने उघडीप दिल्यावर ते बुजवण्यात येतील. - नानासाहेब कामठे, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद.
पठारवाडी रस्त्यावर पडलेले खड्डे.