बारामती-पुणे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 01:48 PM2022-08-09T13:48:03+5:302022-08-09T13:53:22+5:30
बारामती-पुणे रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन...
बारामती :बारामती-पुणे या रेल्वेसेवेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत बारामती-पुणेरेल्वे प्रवासी संघाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
या संदर्भातील निवेदन प्रवाशांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्याकडे दिले आहे. बारामती-पुणे (गाडी क्रमांक ०१५२६) सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी बारामतीहून निघते. दौंडला आठ वाजून दहा मिनिटांनी पोहोचते. हीच गाडी बारामतीहून सकाळी सात वाजता निघाल्यास दौंडला आठ वाजता पोहोचेल. तसेच पुढे पुण्याला ती साडेनऊ वाजता पोहोचेल. ही वेळ चाकरमान्यांना सोयीची आहे. त्यामुळे या वेळेत बदल करा. तसेच सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी सुटणारी गाडी (क्रमांक ०१५१२) ही पूर्ववत सुरू करावी. पुणे- बारामती मेमू गाडी पुण्याहून संध्याकाळी पावणेसात वाजता सुटते. दौंडला ती आठ वाजून दहा मिनिटांनी येते. दौंडला या गाडीचा पंधरा मिनिटांचा थांबा कमी करून पाच मिनिटांचा करावा जेणेकरून बारामतीला ही गाडी रात्री नऊच्या दरम्यान पोहोचेल, जेणेकरून बारामतीकरांना रात्री वेळेत घरी पोहोचणे शक्य होईल.
तसेच बारामती दौंड या मार्गावर कटफळ व शिर्सुफळ, मळद या रेल्वे स्थानकांपुरते दोन ट्रॅक करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या वाढवता येईल. सध्या दौंडवरून प्रवासी गाडी किंवा मालगाडी बारामतीकडे निघाल्यास बारामतीला पोहोचेपर्यंत व बारामतीहून दौंडला पोहोचेपर्यंत दुसरी गाडी सोडता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.