खांडस ते भीमाशंकर रोपवेची मागणी; रोपवे कृती समितीचे शिष्टमंडळ नितीन गडकरींना भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2023 06:02 PM2023-04-30T18:02:48+5:302023-04-30T18:02:59+5:30
भीमाशंकर ते खांडस रोपवे झाल्यास दळणवळणासाठी फायद्याचे ठरणार
डिंभे: पुणे व रायगड जिल्ह्याला जोडण्यासाठी भीमाशंकर ते खांडस असा रोपवे व्हावा अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. याबाबत रोप वे कृती समितीची बैठक नुकतीच कडाव -खांडस येथे पार पडली आहे. या मागणीसाठी कृती समितीचे शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक व उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असून एक लक्ष सह्यांचे निवेदन त्यांना सादर करणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंग पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर खांडस गावापासून सात-आठ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या माथ्यावर वसले आहे. पावसाळ्यामध्ये रायगड जिल्ह्यातून खांडस मार्गे भीमाशंकरकडे अनेक पर्यटक रायगड जिल्ह्यातील खांडस गावापासून अतितीव्र उत्तराचा कडा चढून शिडी घाटाच्या मार्गे पदरवाडी पासून भीमाशंकर कडे प्रवास करताना पहावयास मिळतात.
पर्यटनासाठी चालना मिळावी, स्थानिक लोकांना भीमाशंकर ते खांडस असा सुखकर प्रवास करता यावा यासाठी भीमाशंकर ते खांडस रोपवे झाल्यास दळणवळणासाठी हा रोपवे फायद्याचे ठरणार आहे. असून स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्रालयाकडून राष्ट्रीय रोपवे कार्यक्रम पर्वतमालाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई यांना रोपवे उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या ठिकाणची यादी सादर करणे बाबत सुचविण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत डोंगराळ प्रदेश शहरातील अतिगर्दीची ठिकाणी दुर्गम भागांना रोपवेद्वारे जोडण्यासाठी शासनामार्फत समन्वय करण्यासाठी मुख्य अभियंता सां.बा.विभाग मुंबई यांना प्राधिकृत करण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र शासनामार्फत सादर केलेल्या यादीमध्ये भीमाशंकर रोपवे चा समावेश आहे.