सहा गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी ५६२ कोटींची मागणी
By राजू हिंगे | Updated: February 11, 2025 11:31 IST2025-02-11T11:30:29+5:302025-02-11T11:31:47+5:30
महापालिकेची राज्य सरकारकडे मागणी : प्रकल्पासाठी ५१५ कोटींचा खर्च

सहा गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी ५६२ कोटींची मागणी
११ एकरच्या भूसंपादनासाठी ४७ कोटी रुपये
पुणे : पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट ३४ गावांपैकी खडकवासला, धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नांदेड, सणसवाडी या गावांमध्येच गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे रुग्ण आढळले आहेत. दूषित पाण्यामुळेच हा आजार झाला आहे. त्यामुळे या गावासाठी जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्यांसह पाणीपुरवठा योजनांसाठी ५६२ कोटी रुपयांची गरज आहे. या कामासाठी हा निधी राज्य सरकारने पुणे महापालिकेला द्यावा, अशी मागणी पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डीएसके विश्व, आंबेगाव या गावांमध्ये गुइलेन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण मोठ्या संख्येने आढळले होते. त्यानंतर महापालिकेच्या विहिरीतील पाण्याची तपासणी केल्यानंतर पाणी दूषित नसल्याची माहिती पुढे आली होती. या गावांना पुणे महापालिका रॉ- वॉटरचा पाणीपुरवठा करत आहे. या सहा गावांमध्ये सद्य:स्थितीमध्ये सुमारे ३० एमएलडी पाणीपुरवठा करत आहे. त्यापैकी २८ एमएलडी पाणी रॉ-वॉटर देण्यात येत आहे. त्यामुळे या भागासाठी पुणे महापालिकेने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला आहे.
या गावची २०२४ ची लोकसंख्या १ लाख ७८ हजार २८७ आहे. या गावाची २०५२ ची लोकसंख्या अंदाजे ४ लाख २७ हजार आहे. या भागाची सध्याची पाण्याची मागणी ही ३३ एमएलडी असून, २०५२मध्ये ही मागणी ८९ एमएलडी होणार आहे. त्यामुळे या सहा गावांसाठी समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये खडकवासला येथे जलशुद्धीकरण प्रकल्प, २९ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी ५६२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पण, सद्य:स्थितीमध्ये पुणे महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता हा खर्च करणे शक्य होणार नाही. त्यामुळे या गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी पालिकेला प्रकल्पासाठी ५१५ कोटी आणि भूसंपादनासाठी ४७ कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.